इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 05:57 IST2025-08-09T05:56:48+5:302025-08-09T05:57:27+5:30
हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी प्रतीकात्मक आंदोलन केले.

इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
मुंबई : उद्धव ठाकरे हे दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसल्याच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. उद्धव ठाकरे भाजपसोबत होते तेव्हा त्यांना मान होता, पण त्यांनी हिंदुत्व सोडले, आता त्यांच्या पदरात अपमानाची शेवटची रांग आली, अशी टीका भाजपने केली. तर काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखविली आहे, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला. उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने आम्ही मागे गेलो, असा खुलासा केला आहे.
हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांची साथ सोडली तर काय होते हे दिल्लीतील बैठकीत शेवटच्या रांगेत बसून उद्धव ठाकरेंनी दाखवून दिले. काँग्रेसचरणी लीन झालेल्या उबाठाला माफ करा, अशी घोषणाबाजी करत सेनेने छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी प्रतीकात्मक आंदोलन केले.
उद्धव ठाकरे दिल्लीसमोर झुकणार नाही वगैरे म्हणतात, प्रत्यक्षात तिथे त्यांना काय वागणूक मिळाली ते दिसते. आमच्याकडे ते होते त्या वेळी पहिल्या रांगेत असायचे. आता तिथे काय मान मिळतो ते दिसले आहे.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
एखाद्याचा अपमान झाला तरी त्याला काहीही वाटत नसेल, तर मी काय प्रतिक्रिया देणार? जे स्वाभिमान गहाण ठेवत आहेत आणि बाळासाहेबांचे विचार विकत आहेत, त्यांना काहीच वाटणार नाही, उलट त्यांनाच विचारले पाहिजे, तुम्हाला इतक्या मागे का बसवले होते?
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
...म्हणून आम्हीच मागे बसलो : संजय राऊत
उद्धव ठाकरे यांना पुढेच बसवले होते, परंतु सादरीकरणासाठी लावलेल्या स्क्रीनच्या प्रकाशामुळे डोळ्यांना त्रास होत असल्याने उद्धव ठाकरे, आदित्य आणि मी मागे बसण्याचा निर्णय घेतला, असे खा. संजय राऊत यांनी स्पष्ट केले.