अहिल्यानगर - शहरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. अखेर काळे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी आज ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. शनिवारी रात्री किरण काळे आणि समर्थकांनी मुंबईकडे प्रस्थान केले. अहिल्यानगर शहराला पुन्हा गतवैभव मिळवून देत खरं भगवं वादळ आणायचंय असा निर्धार किरण काळे यांनी व्यक्त केला.
पुढील काळात शहरात महापालिका निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यातून पक्षांतराचे वारे राज्यात वाहू लागले आहे. मागील महिन्यात उद्धव ठाकरे गटातील १३ नगरसेवकांसह ४० पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला होता. आणखीही काही पक्षप्रवेश शिंदेसेनेत होणार आहेत. त्यातील काही जण भाजपाची वाट धरत आहेत. अशावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेले किरण काळे हे ठाकरे गटात नशीब आजमवत असल्याने उद्धवसेनेला काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत किरण काळे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश होणार आहे. शुक्रवारी रात्री हे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू धर्मरक्षक अनिलभैय्या राठोड यांनी घालून दिलेल्या विचारांच्या मार्गावर चालत पुन्हा एकदा अहिल्यानगर शहराला गतवैभव मिळवून द्यायचे आहे खरं भगवं वादळ आणायचं आहे असं किरण काळे यांनी म्हटलं.
किरण काळे यांचा काँग्रेसला रामराम
१० फेब्रुवारी रोजी किरण काळे यांनी तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहून पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्षपदासह पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपवली. माझ्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीत मी पक्ष संघटना बांधणीसाठी सर्वोत्तम प्रयत्न केले. पक्षाने दिलेले कार्यक्रम राबवले तसेच स्थानिक पातळीवर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी निगडित विविध प्रश्न सोडवण्यासाठी काम करण्याचा मनापासून प्रयत्न केला. पक्षाने दिलेल्या संधीबद्दल मी मनापासून नम्रपूर्वक कृतज्ञ आहे तरी माझ्या राजीनामा स्वीकार करावा अशी विनंती किरण काळे यांनी केली होती.