शिंदेसेनेत जाण्याची चाहुल लागताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 15:51 IST2025-03-07T15:50:25+5:302025-03-07T15:51:06+5:30
जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल

शिंदेसेनेत जाण्याची चाहुल लागताच माजी आमदाराची उद्धव ठाकरेंनी केली हकालपट्टी
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात ऑपरेशन टायगर अंतर्गत शिंदेसेनेने उद्धव ठाकरेंच्या पक्षाला धक्के देण्यास सुरुवात केली आहे. या ऑपरेशन टायगरला सर्वात मोठं यश रत्नागिरी जिल्ह्यात येत असून याठिकाणी उद्धवसेनेची घरघर थांबायची चिन्हे नाहीत. याठिकाणचे माजी आमदार संजय कदम हे शिंदेसेनेच्या वाटेवर आहेत याची चाहुल लागताच उद्धव ठाकरेंनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या सहीचं पत्र उद्धवसेनेकडून जारी करण्यात आलं आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी(खेड, गुहागर, दापोली, मंडणगड) याठिकाणचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असं सांगितले आहे.
दापोलीचे माजी आमदार संजय कदम शिंदेसेनेच्या वाटवर आहेत. जर त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश झाला तर उद्धवसेनेला जिल्ह्यात पहिल्यापासून सुरुवात करुन पक्षबांधणी करावी लागेल. मात्र आधीची पक्षबांधणी होताना जे निष्ठावंत, झोकून देऊन काम करणारी फळी शिवसेनेकडे होती, तशी फळी आता शिल्लक नाही. सत्तेशिवाय राहण्याची तयारी नसलेल्यांची संख्या आता अधिक आहे. त्यामुळे नव्याने पक्षबांधणी आता सोपी राहिलेली नाही.
उद्धवसेनेला मोठे धक्के
विधानसभा निवडणुकीनंतर माजी आ. राजन साळवी, माजी आ. सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेंद्र महाडिक आणि पराग बने, दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख विलास चाळके, दापोली नगर पंचायतीमधील नगरसेवक या सर्वांचे पक्ष सोडणे उद्धवसेनेसाठी मोठे धक्के आहेत.
पडझड सावरण्याचे प्रयत्नच झाले नाहीत
ज्यावेळी रत्नागिरीतील दोन आमदारांनी आणि सिंधुदुर्गातील एका आमदाराने शिंदेसेनेसोबत जाणे निश्चित केले, तेव्हाच उद्धवसेनेला आपल्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागल्याचे लक्षात आले. पण पडझड सावरण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून किंवा त्यांच्या नेत्यांकडून झाले नाहीत. त्यामुळे पदाधिकारी निराश झाले. ज्यावेळी पक्षाचे दोन भाग झाले, तेव्हा जिल्ह्यात भास्कर जाधव आणि राजन साळवी हे दोन आमदार उद्धवसेनेतच होते. त्यांना अधिक बळ देणे, अन्य तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षासोबत ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देणे, आवश्यक होते. मात्र त्या दोघांबाबतही पक्षाकडून फारशा सकारात्मक गोष्टी घडल्या नाहीत.
दरम्यान, ज्या दोन आमदारांनी पक्ष सोडला, त्या जागांसाठी पक्षाने काहीच प्रयत्न केले नाहीत. दोन वर्ष हाताशी असतानाही उद्धवसेनेने काहीच हालचाली न केल्याने एक एक शिलेदार बाजूला होत गेला. त्यामुळे उद्धवसेनेला घरघर लागली आहे. कोकण हा बालेकिल्ला असतानाही अतिदुर्लक्ष झाल्याने उद्धवसेनेची पडझड होतच राहिली.