“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:17 IST2025-07-20T13:11:16+5:302025-07-20T13:17:05+5:30
Uddhav Thackeray Interview: हिंदी सक्ती, धारावी पुनर्विकास, गिरणी कामगारांना घरे या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर सडकून टीका केली.

“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray Interview: मराठी माणसाचे एक वैशिष्ट्य आहे. मराठी माणूस आततायीपणा करणारा नाही. मराठी माणूस हा विघ्नसंतोषी नाही. मी भला माझे काम भले, असा मराठी माणूस आहे. मराठी माणूस कोणावर अन्याय करत नाही. परंतु, अन्याय झाला, तर तो सहन न करणारा मराठी माणूस आहे. शेवटी सहनशीलतेचा कडेलोड व्हायला लागला. तेव्हा मराठी माणूस पिसाळला आहे. जसा तो संयुक्त महाराष्ट्र लढ्यावेळी पेटला होता. किती काळ हे सहन करायचे, आमची चूक काय, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीवरून टीका केली.
संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे बोलत होते. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. शिवसेना प्रमुख असतील किंवा माझे आजोबा असतील, तेही हेच सांगायचे. तुम्हाला जेवढ्या भाषा शिकायच्या आहेत, तेवढ्या शिका. पण तुम्ही जबरदस्ती करू नका. तुम्ही राज्यसभेत हिंदीत बोलता. मीडियासमोर मला हिंदीत प्रतिक्रिया विचारली, तर मी हिंदीत बोलतो. आमचा हिंदीला विरोध किंवा द्वेष नाही. पण हिंदीची सक्ती नको, असे उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितले.
फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...
महाराष्ट्राच्या भविष्याकडे आपण कशा पद्धतीने पाहता? संजय राऊतांच्या या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या भानगडी, लफडी बाहेर येत आहेत, ते त्यांनी मोडीत काढायला हवे. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो. त्यांनी हे माझे मत टोमणा म्हणून नाही, तर सल्ला म्हणून घ्यावे. हे आधीच स्पष्ट करतो. ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील, तर हे जे काही आजूबाजूला चाललेले आहे, ते त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम आहे. कुठे जमिनी लाटल्या जात आहेत, कुठे जमीन इनाम म्हणून दिली जात आहे. कुठे ३ हजार कोटींची चोरी सर्वोच्च न्यायालय पकडून देत आहे. हे सगळे जे काही चालले आहे, याचे प्रमुख म्हणून बदनाम देवेंद्र फडणवीस होत आहेत. आपण म्हणतो ना दिव्याखाली अंधार, तसा हा प्रकार आहे का, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.
हा देश अदानी चालवताहेत की अडाणी चालवत आहेत
हा देश अदानी चालवताहेत की अडाणी चालवत आहेत. शिवसेना मुंबईसाठी कुठेही तडजोड करत नव्हती. ती तोडायचा, चोरण्याचा आणि संपण्याचा प्रयत्न एवढ्यासाठी केला. धारावीचा पुनर्विकास मीही करत होतो. धारावीसाठी भूखंड घशात फुकट घातले. आमच्या गिरणी कामगारांना द्याना फुकट. गिरणी कामगार तुमचे कुणीच लागत नाही. त्यांच्यासाठी काहीच नाही. ज्यांनी मुंबई मिळवून दिली त्यांना काही देत नाही. देवनारचं डंपिंग ग्राऊंडही अदानीलाही दिली. डंपिंगचा कचरा साफ करणारी कंपनीही अदानींचीच आहे. त्या धारावीच्या बाजूला वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स आहे. तिथे अहमदाबादला जाणाऱ्या बुलेट ट्रेनचे स्टेशन आहे. हा योगायोग समजायचा का? धारावीत टॉवर येणार. तिकडे धारावीत कोणी मराठी माणूस घर विकत घेऊ शकत नाही. मग कोण येणार? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
माहीम कॉजवेजवळची जमीन का धारावीकरांना दिली जात नाही
वांद्रे रिक्लेमेशन माहीम कॉजवेजवळची जमीन का धारावीकरांना दिली जात नाही. कांजूरची जागा आपण मेट्रोसाठी मागत होतो. ती दिली नाही. आपलं सरकार पाडलं. आरेचे जंगल पाडले. आरेत मेट्रोची कारशेड होणार आणि कांजूरची जागा अदानीला देणार. आधी गिरणी कामगार फसला आणि आता या मुंबईतील उरलासुरला मराठी माणूस फसवला जात आहे आणि हे सगळे गौतम अदानी नावाच्या उद्योगपतीसाठी कायदे बदलले जात आहेत, नियम बदलले जात आहेत. याआधी महाराष्ट्रात पुनर्वसन प्रकल्प झाले आहेत. हा प्रकल्प नवीन नाही. धारावी तुम्ही अदानीला दिल्यावर त्याच्यावर सर्वच स्तरांवरून जो सवलतींचा वर्षाव सुरू आहे आणि त्यांच्यावर मुंबईतील भूखंडाची मेहेरबानी दिली जात आहे. ते यापूर्वी कधी झालं नव्हते, ते का होत आहे, अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली.
दरम्यान, धारावी पुनर्विकास प्रकल्प मुंबईतील मूळ मराठी माणसाला विस्थापित करण्याचा एक मोठा कट आहे. जंगलतोड करून किंवा इतर मार्गांनी जमिनी बड्या उद्योजकांना दिल्या जात आहेत. त्यांच्या मित्राला जमिनी देण्याच्या आड आला तर तुम्ही तुरुंगात जाल. कारण जनसुरक्षा धोक्यात आणली आहे. मुंबईकरांनी एकवटून विरोध केला पाहिजे. तुमच्या घरातील वीज, गाड्या तोच देणार म्हणजे तुम्ही गुलाम होणार. मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात आहे. धारावीत गिरणी कामगारांना घरे का देत नाही? कुर्ला मदर डेअरीची जागा ही धारावीच्या पुनर्विकासासाठी दिली आहे. त्याची गरज नाही. ती गिरणी कामगारांना का देत नाही? गिरण्याच्या जमिनीचा वापर फक्त गिरण्यासाठीच होता. पण चेंज ऑफ यूजर्स केले. पण गिरणी कामगारांना घर दिले नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.