“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 15:05 IST2025-10-12T15:05:05+5:302025-10-12T15:05:34+5:30
Uddhav Thackeray News: त्यावेळी अनंत तरे यांचे ऐकले असते तर, आज पश्चात्ताप झाला नसता, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
Uddhav Thackeray News: अनंत तरे एकदा मला भेटले आणि मला सांगितले की, हाच माणूस उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. यावर, मी म्हणालो की, तुम्ही सगळे असताना तो कसा दगा देईल. पण जे घडायला नको होते तेच घडले. आता अनंत तरे असते तर हे कावळे फडफडले नसते. काही जण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने सांगत असतात. तर काही निष्ठेचे मुखवटे लावून आपल्या भोवती फिरत असतात, आपल्याला ते कळत नाही. अनंत तरे यांचे ऐकले असते तर, आज पश्चात्ताप झाला नसता, असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
एका कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिवंगत नेते अनंत तरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेत जोरदार हल्लाबोल केला. अनंत तरे म्हणाले होते हा माणूस एक दिवस दगा देईल आणि तेच झाले. आता घालीन लोटांगण करुन ‘वाचवा-वाचवा’ असा हंबरडा फोडणारी माणसे आज दिसली नसती, या शब्दांत उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला.
सर्वांनी मिळून हे संकट दूर करूया
२०१४ मध्ये शिवसेना-भाजपची युती ठरली होती. सर्व काही ठरले होते. जागावाटप जवळपास पूर्ण झाला होता. अर्ज भरण्यासाठी एकदिवस असतानाच अचानक भाजपकडून युती तोडली गेली. तेव्हाच भाजपने शिवसेनेला संपविण्याचा डाव आखला होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले. त्याचवेळी अनंत तरे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. ते ऐकायला तयार नव्हते. आताचे जे आहेत, लोटांगणवीर ते आले आणि ते म्हणाले काहीही करा साहेब, ही जागा जाणार. त्यानंतर मी तरेंशी बोललो. त्यांना म्हणालो एकतर भाजपा आपल्याला संपवायला निघाला आहे. आता समजून घ्या. सर्वांनी मिळून हे संकट दूर करूया, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांना ठाणे विधानसभेमधून उमेदवारी हवी होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव रवींद्र फाटक यांना उमेदवारी दिली. त्यामुळे अनंत तरे हे कमालीचे नाराज झाले होते.
----००००----