"उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले, माझ्या मुलाला वाचवा", नितेश राणेंचा स्फोटक दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 15:39 IST2025-03-20T15:35:35+5:302025-03-20T15:39:06+5:30
Disha Salian Case Update: दिशा सालियन मृत्यू प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली असून, नितेश राणेंनी यात ठाकरेंबद्दल स्फोटक दावा केला आहे.

"उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कॉल केला आणि म्हणाले, माझ्या मुलाला वाचवा", नितेश राणेंचा स्फोटक दावा
Nitesh Rane Disha Salian Case Update: उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना कॉल केला होता. तुम्हालाही दोन मुलं आहेत. माझ्या मुलाकडूनही चूक झाली असेल. त्याला वाचवा असे उद्धव ठाकरे म्हणाले होते, असा दावा कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे या प्रकरणाने पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
"उद्धवजींनी नारायण राणेंना कॉल का केला होता?"
विधानभवन परिसरात बोलताना कॅबिनेट मंत्री नितेश राणे म्हणाले, "उद्धवजींना जर वाटत आहे की आम्ही सगळे लोक राजकीय आरोप करत आहोत, तर त्यांनी नारायण राणेंना कॉल का केला होता? आणि म्हणाले होते की, माझ्या मुलाला यातून वाचवा."
ठाकरेंनी एकदा नव्हे, दोन वेळा कॉल केले -नितेश राणे
"नारायण राणे यांना एकदा नव्हे तर दोन वेळा कॉल केला होता. तुम्हालाही दोन मुल आहेत. माझ्या मुलाकडूनही काही चूक झाली असेल, तर त्याला वाचवा. नारायण राणेंनी हे जाहीरपणे सांगितलेले आहे", असा दावा करत नितेश राणेंनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केला.
"त्यांना जर असं वाटत असेल की, त्यांना कुणीतरी टार्गेट करत आहे, तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी. पळतात का? काल मी बघत होतो, नेहमी तावातावाने बोलणार भास्कर जाधव पळत होते. सुनील प्रभू न वाजणारा फोन कानाला लावून कुठेतरी निघून जात होते. पळतात कशाला हे?", असा मुद्दा नितेश राणे यांनी ठाकरे गटाच्या नेत्यांच्या भूमिकेबद्दल मांडला.
आदित्य ठाकरेंना नितेश राणेंचा सवाल
"त्यांनी येऊन सांगावं की, नितेश राणे खोटं बोलतोय. बाकीचे सगळे खोटं बोलत आहेत. दिशा सालियनचे वडील खोटं बोलत आहेत. सांगून टाका. विषय मिटवून टाका. आम्ही माफी मागतो महाराष्ट्राची. त्यांची माफी मागू. नैतिकतेच्या आधारे आता का येऊन बोलत नाही, आदित्य ठाकरे. माझ्यावर आरोप झालाय. जोपर्यंत आरोप मिटत नाही, तोपर्यंत मी आमदार राहणार नाही, असे आदित्य ठाकरे का म्हणत नाहीत?", असा सवाल नितेश राणे यांनी आदित्य ठाकरेंना केला.