नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 05:36 IST2025-01-12T05:25:16+5:302025-01-12T05:36:38+5:30
राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे.

नागपूरपासून ते मुंबईपर्यंत उद्धवसेनेची स्वबळ तयारी; आधी चर्चा करा, काँग्रेसची कडक प्रतिक्रिया
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो, असे उद्धव सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
राऊत म्हणाले, आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. लोकसभा निवडणूक होऊन एवढे महिने झाले. अजून इंडिया आघाडीची बैठक झाली नाही. काँग्रेस मोठा पक्ष आहे, त्यांची जबाबदारी आहे बैठक बोलावण्याची, असा चिमटाही त्यांनी काढला.
...ते तर रिकामटेकडे
आघाडी राहील की तुटेल, याकडे आमचे लक्ष नाही. महाराष्ट्राला प्रगतीकडे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राऊत यांनी त्यांचे मत व्यक्त केले, ते रिकामटेकडे आहेत, मी नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
...तर काँग्रेसचीही तयारी
आघाडीमध्ये कोणताही निर्णय चर्चा करून घेतला पाहिजे. परस्पर कोणी निर्णय जाहीर करत असेल तर काँग्रेस पक्षही त्यांचा निर्णय घेईल, असे प्रा. वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
- आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा आमचा मार्ग आम्हाला मोकळा, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली.