उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 08:42 IST2025-08-13T08:37:21+5:302025-08-13T08:42:17+5:30
NCP News: पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर केली.

उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
NCP News: देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी संघाचे नाशिक तालुकाध्यक्ष शरद गायके , शरदचंद्र पवार गटाचे नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, सचिन पिंगळे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथील वंचित आघाडीचे नेते कृष्णा काशीद यांनीही आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांची कामे केली तर लोक आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात. हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी व्हा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केले.
केंद्र व राज्य सरकारच्या या घरकुल योजनेचा लाभ नक्की मिळणार
शेतकरी, युवकांसाठी कुशल रोजगार देणार्या योजना सरकार राबवत आहे. केंद्र सरकारने राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट दिले आहे. आपापल्या भागात या योजनांचा लाभ लोकांना कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. जितके लोकांपर्यंत पोहोचाल तेवढा पक्ष वाढीला हातभार लागणार आहे, असे सांगतानाच स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण होत आली तरी अजूनही काही लोक बेघर आहेत त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या या घरकुल योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना, असा संतप्त सवाल करतानाच मी बारामतीतून सलग निवडणुका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही हेही आवर्जून अजित पवार यांनी सांगितले.