दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 12:16 IST2026-04-07T12:15:47+5:302026-04-07T12:16:47+5:30

Ashok Kharat News : दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

Two senior female police officers in contact with 'Bhondu Baba' Ashok Kharat; Shocking revelations likely | दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांचे पाश आता प्रशासकीय वर्तुळापर्यंत पोहोचले आहेत. एका आयएएस अधिकाऱ्याच्या चर्चेनंतर आता दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे आता पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

आवडत्या पोस्टिंगसाठी 'बाबा'चे पाय धरले?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DCP आणि ACP दर्जाच्या दोन महिला अधिकारी अशोक खरातच्या संपर्कात होत्या. आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली किंवा पोस्टिंग मिळावी, यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी खरातची मदत घेतल्याची चर्चा आहे. या बदल्यांसाठी खरात आणि या अधिकाऱ्यांमध्ये काही आर्थिक व्यवहार झाले आहेत का? याचा तपास आता एसआयटीकडून केला जाण्याची शक्यता आहे.

चमत्कार नाही, तर ती हातचलाखी होती; खरातची कबुली

अशोक खरातने एसआयटी चौकशीत अनेक धक्कादायक कबुली दिल्या आहेत. त्याने मान्य केले आहे की, महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी तो विज्ञानाचे खोटे नाव वापरत असे, ज्याला लोक चमत्कार किंवा वशीकरण समजत होते, ती निव्वळ हातचलाखी होती. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी आणि त्यांना धमकवण्यासाठी तो विविध क्लृप्त्या वापरत असे. चौकशीदरम्यान त्याने उद्धटपणे "दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए" असे म्हटल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

कुटुंबीयांवरही संशयाची सुई

अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर आता पोलिसांची तपास चक्रे अधिक वेगाने फिरू लागली आहेत. खरातचा मुलगा हर्षवर्धन आणि त्याच्या मुलीची आज एसआयटीकडून सखोल चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आणि खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत.

अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते आज सायंकाळी या संपूर्ण प्रकरणावर अधिकृत पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत खरातने केलेले आर्थिक गैरव्यवहार आणि लैंगिक शोषणाबाबतचे आणखी काही मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Two senior female police officers in contact with 'Bhondu Baba' Ashok Kharat; Shocking revelations likely