RSS पासून अंतर ठेवणाऱ्या अजित पवारांचेदेखील दोन आमदार पोहोचले बौद्धिकाला
By योगेश पांडे | Updated: December 19, 2024 12:50 IST2024-12-19T12:46:24+5:302024-12-19T12:50:58+5:30
संघाकडून मार्गदर्शन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचीदेखील बौद्धिकाला उपस्थिती होती.

RSS पासून अंतर ठेवणाऱ्या अजित पवारांचेदेखील दोन आमदार पोहोचले बौद्धिकाला
नागपूर: महायुतीच्या आमदारांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृतिमंदिर परिसराला भेट दिली. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघाचा परिचय करून दिला व शताब्दी वर्षांतील कार्यांबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे यंदा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन आमदारांनी उपस्थिती लावली होती. मागील वेळेस त्यांच्या पक्षाचा एकही सदस्य संघस्थानी पोहोचला नव्हता.
हिवाळी अधिवेशन कालावधीत २०१५ सालापासून दरवर्षी संघातर्फे भाजप व मित्रपक्षांच्या आमदारांना रेशीमबाग येथे बोलविण्यात येते. मागील वर्षी अजित पवार व त्यांचे आमदार पोहोचले नव्हते. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले होते. या वर्षी मात्र राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे व राजकुमार बडोले हे पोहोचले. संघ पदाधिकाऱ्यांनी त्यांचेदेखील स्वागत केले. दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते.
सर्व आमदारांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळी नमन केले. या वर्गाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, संजय राठोड, प्रताप सरनाईक, अतुल सावे, नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल, शंभूराज देसाई, दीपक केसरकर, गुलाब पाटील, गणेश नाईक, उदय सामंत, सुधीर मुनगंटीवार, आशिष देशमुख, रवींद्र चव्हाण, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, संभाजी पाटील निलंगेकर, भरत गोगवले, संजय शिरसाट, चित्रा वाघ, संजय कुटे, नीतेश राणे, संतोष दानवे, मोहन मते, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मेघना बोर्डीकर, अतुल भातखळकर, श्वेता महल्ले, निरंजन डावखरे, समीर कुणावार, परिणय फुके, मनीषा कायंदे, राम कदम, बंटी भांगडिया, गोपिचंद पडळकर, बंजारा समाजाचे धर्मगुरु बाबासिंग राठोड, सुरेश धस आदींची उपस्थिती होती.
संघकार्यात सहभागी व्हा, जनतेसाठी काम करा
संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी उपस्थित लोकप्रतिनिधींना संघकार्याबद्दल माहिती दिली. संघाचे सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे. संघाने या शताब्दी वर्षात पंचपरिवर्तनाचा नारा दिला आहे. त्या अनुषंगाने सर्व आमदारांनी देशाच्या हितासाठी कार्यरत राहावे. तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे तामशेट्टीवार यांनी सांगितले. याप्रसंगी संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधरराव गाडगे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांचीदेखील उपस्थिती होती.सर्व आमदारांना संघाचा प्रवास आणि कार्य सांगणाऱ्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.
कारेमोरे म्हणाले, स्वयंप्रेरणेने आलो
तुम्हाला पक्षाकडून इथे येण्याबाबत सांगण्यात आले का अशी कारेमोरे यांना विचारणा करण्यात आली. मी या ठिकाणी स्वयंप्रेरणेने आलो आहे. पक्षाकडून या ठिकाणी जायचे आहे, अशी कुठलीही सूचना नाही. येथे यायला अडचण काय असा सवाल कारेमोरे यांनी उपस्थित केला.
माझी सुरुवात संघाच्या शाखेतूनच : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील संघाच्या मुख्यालयात दाखल झाले होते. मी याअगोदरदेखील रेशीमबागेत आलो असून समाधीस्थळाचे दर्शन घेतले आहे. संघ परिवाराचे माझे लहानपणापासून संबंध आहे. संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली आहे. नंतर मी शिवसेनेच्या शाखेत गेल्यानंतर बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांचे विचारांची शिकवण घेतली. संघ आणि शिवसेनेचे विचार एकसारखे आहेत. निरपेक्ष भावनेने कसे काम केले पाहिजे हे संघ परिवाराकडून शिकावे. कुठलीही प्रसिद्धीची भावना ठेवता संघाचा स्वयंसेवक काम करत असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले.