Two goons from Rajasthan were injured in the incident | किणी टोल नाक्यावर चकमक, राजस्थानचे दोन गुंड जखमी-दोन्ही बाजूने गोळीबार; पुणे-बंगलोर महामार्गावर थरार

किणी टोल नाक्यावर चकमक, राजस्थानचे दोन गुंड जखमी-दोन्ही बाजूने गोळीबार; पुणे-बंगलोर महामार्गावर थरार

ठळक मुद्देदोघेही जमिनीवर कोसळल्यानंतर झडप टाकून त्यांना पकडले. कारचालक श्रीराम बैष्णोई यालाही पकडण्यात आले.मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा थरार सुरू झाला. दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

कोल्हापूर : राजस्थानमधून महाराष्ट्रात पळून आलेल्या गुंडांच्या कारला पुणे-बंगलोर महामार्गावर अडविले असता त्यांनी कोल्हापूरपोलिसांवर बेछूटपणे गोळीबार करीत पळून जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघे गुंड गंभीर जखमी झाले. शामलाल गोवर्धन बैष्णोई (वय २२, रा. जोधपूर), श्रवणकुमार मनोहरलाल मांजू-बैष्णोई (२४, रा. विष्णुनगर, बारखी, ता. आसिया, जि. जोधपूर) अशी त्यांची नावे आहेत.

त्यांना शिताफीने पकडून कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारचालक श्रीराम पांचाराम बैष्णोई (२३, रा. बेटलाईन जोधपूर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या कक्षामध्ये रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मंगळवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास हा थरार सुरू झाला. दहा मिनिटे दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता.

राजस्थानच्या जोधपूर शहरामध्ये शामलाल बैष्णोई, श्रवणकुमार मांजू-बैष्णोई व श्रीराम बैष्णोई हे कुख्यात गुंड आहेत. त्यांची याठिकाणी मोठी दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, लूटमार, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे त्यांच्यावर आहेत. काही सिने अभिनेते, व्यापारी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसह पोलिसांना ठार मारण्याची धमकी देत होते. जोधपूर जिल्ह्यातील काही हत्याकांडांमध्येही या गुंडांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून तिघेही पसार होते. मंगळवारी सकाळी ते कारमधून कर्नाटकातील हुबळीहून निघाले. राजस्थान पोलिसांनी ही माहिती बेळगाव पोलिसांना दिली.

बेळगाव पोलिसांनी त्यांच्या कारला अडविण्याचा प्रयत्न केला असता तेथील पोलिसांना चकवा देत ते कोल्हापूरच्या दिशेने आले. बेळगाव पोलिसांनी ही माहिती कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांना दिली. देशमुख यांनी किणी टोलनाक्यावर नाकाबंदी करण्याच्या सूचना केल्या. टोलनाक्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरू असल्याचे समजताच कारचालक श्रीराम बैष्णोई भांबावून गेला. कार मागे वळविण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाठीमागे पोलिसांची गाडी दिसताच त्याने दुस-या लेनमधून कार पुढे घेण्याचा प्रयत्न केला असता ती दुभाजकावर आदळली.

पोलिसांनी समोर व पाठीमागून घेराव घातल्याचे लक्षात आल्यानंतर कारमधून शामलाल बैष्णोई व श्रवणकुमार मांजू-बैष्णोई हे दोघेही दरवाजा उघडून बाहेर पडले. पोलीस त्यांना पकडण्यासाठी पुढे येताच त्यांच्या दिशेने शामलालने रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल त्यांच्या दिशेने गोळीबार केला. शामलाल बेछूटपणे गोळीबार करीत शेतवडीच्या दिशेने पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्याच्या दोन्ही पायांवर व श्रवणकुमारच्या डाव्या पायावर गोळीबार करून जखमी केले. दोघेही जमिनीवर कोसळल्यानंतर झडप टाकून त्यांना पकडले. कारचालक श्रीराम बैष्णोई यालाही पकडण्यात आले.

Web Title: Two goons from Rajasthan were injured in the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.