लोकसभेवेळचा 'पिपाणी'चा आवाज, विधानसभेवेळी बंद करा; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 15:21 IST2024-06-24T15:21:01+5:302024-06-24T15:21:36+5:30
शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत कमीतकमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे आपल्याला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह परत मिळावे अशी मागणी केली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.

लोकसभेवेळचा 'पिपाणी'चा आवाज, विधानसभेवेळी बंद करा; शरद पवारांचे निवडणूक आयोगाला पत्र
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जे चिन्ह दिलेले त्याच्याशी साधर्म्य असलेले चिन्ह अपक्ष उमेदवारांना दिले गेले. याचा फटका पवारांच्या उमेदवाराला बसला. यामुळे शरद पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानसभा निवडणुकीत ते चिन्ह वगळावे अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ असा इशारा दिला आहे.
शरद पवारांच्या गटाला तुतारी हे चिन्ह देण्यात आले होते. हे चिन्ह लोकांपर्यंत कमीतकमी काळात पोहोचणार नाही म्हणून पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेला होता. तिथे आपल्याला राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह परत मिळावे अशी मागणी केली होती. परंतू सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. यानंतर लोकसभेला काही मतदारसंघांत निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह अपक्षांना देत संभ्रम निर्माण केल्याचा आरोप पवार गटाने केला होता.
सातारा आणि दिंडोरी मतदारसंघात पिपाणी चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवाराला फटका बसल्याचा आरोप करण्यात येत आहे. साताऱ्याचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा ४५ हजार मतांनी पराभव झाला होता. पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला ३७ हजार मते पडली होती. तसेच दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचा १ लाख १३ हजार मतांनी पराभव केला होता. परंतू, पिपाणी चिन्ह असलेल्या बाबू भरगे यांना १ लाख ०३ हजार मते पडली होती. एका मतदारसंघात पराभव तर एका मतदारसंघात विजय मिळूनही मते दुसरीकडे गेल्याने पवार गटाने ही तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
लोकसभेला जो फटका बसला तो विधानसभेला बसू नये यासाठी शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून हे पत्र पाठविण्यात आले आहे. खुल्या निशाणीमधून पिपाणी हे चिन्ह वगळावे अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा अन्यथा न्यायालयात जाणार असा इशाराही देण्यात आला आहे.