"परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य!", राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे मानले आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2023 21:50 IST2023-02-24T21:48:42+5:302023-02-24T21:50:36+5:30
Raj Thackeray : केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले आहेत.

"परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणं हेच खरं हिंदवी सुराज्य!", राज ठाकरेंनी केंद्र सरकारचे मानले आभार
मुंबई : गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावावरुन चर्चा सुरु होती. यावर आज केंद्र सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या बैठकीत औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' असे नामांतर करण्यास मंजुरी दिली होती. यानंतर या नामांतराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला होता.
केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले आहेत. औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' आणि उस्मानाबादचे 'धाराशिव' करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला भारत सरकारने मान्यता दिली आहे त्याबद्दल भारत सरकारचे मन:पूर्वक आभार... परकीय आक्रमकांच्या संस्कृतीचे अवशेष पुसणे हेच खरं हिंदवी सुराज्य!, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, नामांतरावरुन भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु होते. महाविकास आघाडीचे नेते भाजपवर टीका करत आरोप करत होते. केंद्र सरकारच्या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील सरकारने 'करुन दाखविले', असा उल्लेख करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर', उस्मानाबादचे 'धाराशिव' ! राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी ! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार! मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने 'करुन दाखविले'...!, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
➡️ औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 24, 2023
➡️ उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’...! pic.twitter.com/IfXbdFec7r