धनगर आरक्षणासाठी आदिवासी विकास आणि संशोधन कार्यालयाची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 19:39 IST2018-08-24T15:13:27+5:302018-08-24T19:39:04+5:30
धनगर समाजाकडून करण्यात आलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाची सरकारने आजपर्यंत कुठल्याही प्रकारे दखल घेतली गेली नाही.त्यामुळेच सरकारविषयी संतापाच्या भावनेतून या समाजातील काही तरुणांनी आदिवासी विकास कार्यालयाची तोडफोड करण्यात आली.

धनगर आरक्षणासाठी आदिवासी विकास आणि संशोधन कार्यालयाची तोडफोड
पुणे: धनगर समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये समावेश करावा या मागणीसाठी दोघा व्यक्तींनी विधानभवन कार्यालया जवळील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात तोडफड केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४ ऑगस्ट ) दुपारी घडली. निवेदन देण्याच्या बहाण्याने आलेल्या आंदोलकांनी भंडारा उधळत मागण्यांचे पत्रक कार्यालयात भिरकावले. त्यानंतर कार्यालयातील खुर्ची आणि काचा फोडत आरक्षणाच्या घोषणा देत कार्यालयातून पलायन केले.
धनगर आरक्षणाबाबत निवेदन द्यायचे आहे, असे सांगून दोन युवक क्वीन्स गार्डन येथील आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ते संस्थेच्या आस्थापना विभागात गेले. त्यानंतर दोघा युवकांनी कार्यालयात भंडारा उधळून दिला. त्यानंतर मागण्यांचे पत्रक भिरकावित कार्यालयातील खूर्ची तोडली. तसेच फाईल ठेवण्याच्या कपाटाच्या काचा फोडल्या. यानंतर घोषणा देत आंदोलक निघून गेले. या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी आहे. अवघ्या काही मिनिटांमध्ये झालेल्या गोंधळामुळे कर्मचारी देखील भांबावून गेले होते. त्यामुळे कोणी आंदोलकांना रोखण्याचा देखील प्रयत्न केला नाही.
आंदोलकांनी कार्यालयात फेकलेल्या पत्रकात धनगर आरक्षणाचा शेवटचा लढा असा मजकूर लिहीला आहे. तसेच सरकार विरुद्ध धनगर निकाली जंगी मैदान असे त्यावर नमूद केले आहे. शुक्रवार दिनांक ३१ आॅगस्ट औरंगाबाद येथील आमखास मैदान, शाहू महाराज पुतळ्याजवळ असे लढ्याचे स्थळही त्यात देण्यात आले आहे. प्रत्येकाने या अंतिम लढाईत मराठवाड्यात दाखल व्हावे असे आवाहन त्यात करण्यात आले आहे.