ST Bus Fare Hike: प्रवास महागणार; दिवाळीसाठी एसटीने दिले १०% हंगामी भाडेवाढीचे चटके!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 10:31 IST2025-10-01T10:30:09+5:302025-10-01T10:31:07+5:30
MSRTC ST Bus Fare Hike: १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या काळात मिळणार तब्बल ११०० कोटी

ST Bus Fare Hike: प्रवास महागणार; दिवाळीसाठी एसटीने दिले १०% हंगामी भाडेवाढीचे चटके!
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरामध्ये १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी ती लागू राहणार आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे एक हजार ते ११०० कोटीचा महसूल जमा होईल. भाडेवाढीमुळे राज्यातील नागरिकांचा एसटीचा लांब पल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महागणार आहे.
यावर्षी धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर रोजी आहे. दरम्यान, शाळांना सुट्ट्या लवकर पडत असल्याने आणि काही दिवस आधीच प्रवासी संख्या वाढते. त्यामुळे जादा बसगाड्या १५ ऑक्टोबरपासून चालवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासह त्यांचा परतीचा प्रवास लक्षात घेऊन ५ नोव्हेंबरपर्यंत वाढीव बसगाड्या सुरू ठेवण्यात येणार. त्यामुळे या काळासाठी भाडेवाढ लागू करण्यात येणार आहे.
दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करते. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे. त्यानुसार गर्दीच्या हंगामात तात्पुरत्या स्वरुपाची भाडेवाढ केली जाते. ही वाढ साध्या, विठाई, शिवशाही, निमआराम बसकरिता लागू असणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर शिवनेरीकरिता भाडेवाढ लागू असणार नाही.
हंगामी भाडेवाढीनंतर तिकीट (प्रति टप्पा)
गाडीचा प्रकार सध्याचे दिवाळीत
साधी (मिडी,साधी) १०.०५ पैसे ११.०५पैसे
जलद १०.५पैसे ११.०५पैसे
निमआराम १३.६५पैसे १५ रुपये
साधी शयनआसनी १३.६५ पैसे १५ रुपये
साधी शयनयान १४.७५पैसे १६.२५पैसे
एसी शिवशाही(आसनी) १४.२०पैसे १५.६५ पैसे
एसी जनशिवनेरी(आसनी) १४.९०पैसे १६.४०पैसे
भाडेवाढीनंतरचे तिकीट दर(अंदाजित)
मार्ग सध्याचे दिवाळीत
परळ-कोल्हापूर(साधी) ६४०रु. ७००रु.
मुंबई-मालवण(शिवशाही) १३००रु. १४००रु.
मुंबई-जळगाव(स्लीपर) ११००रु. १२५०रु.
मुंबई-छ. संभाजी नगर (साधी) ८००रु. ९०० रु.
मुंबई-सोलापूर(साधी) ७५० रु. ८५० रु.
मुंबई-जालना( साधी) ८००रु. ९०० रु.
मुंबई-लातूर(साधी) ९०० रु. १०००रु.
मुंबई-सांगली (साधी) ७३० रु. ८००रु.
मुंबई- रत्नागिरी(साधी) ६०० रु. ७००रु.