“महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे करायला परिवहन विभाग अग्रेसर राहील”: सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 15:32 IST2026-02-26T15:32:03+5:302026-02-26T15:32:03+5:30
Pratap Sarnaik News:महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

“महाराष्ट्राला देशाचे अग्रगण्य लॉजिस्टिक्स गेटवे करायला परिवहन विभाग अग्रेसर राहील”: सरनाईक
Pratap Sarnaik News: महाराष्ट्र राज्याला देशातील सर्वात सक्षम आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक लॉजिस्टिक्स केंद्र बनवण्याचा परिवहन विभाग पथदर्शक म्हणून भूमिका बजावेल असे प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते 'ऑल इंडिया लॉजिस्टिक वेल्फेअर असोसिएशन' आयोजित समीटला भेट दिल्याप्रसंगी बोलत होते.
मंत्री सरनाईक म्हणाले की मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून आंतरराष्ट्रीय कार्गो हब म्हणूनही वेगाने विकसित होत आहे . मुंबईतून औषधे, ताजी कृषी उत्पादने, अभियांत्रिकी साहित्य आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणावर निर्यात होत असून जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राची मजबूत उपस्थिती आहे.
लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ, परिणामकारक
महाराष्ट्राला मध्य पूर्व, युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियातील बाजारपेठांशी अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगताना त्यांनी पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग सारख्या द्रुतगती मार्गांमुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला असून संपूर्ण राज्यातील मालवाहतुकीला वेग मिळाला आहे. PM गतिशक्ती मास्टर प्लॅन अंतर्गत केंद्र सरकारसोबत समन्वय साधत बंदरे, विमानतळ, रेल्वे आणि रस्ते यांच्यात सुसूत्रता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे लॉजिस्टिक्स ऑपरेशन्स अधिक सुलभ आणि परिणामकारक होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना मिळत आहे
रस्ता वाहतूक ही अर्थव्यवस्थेचा कणा असून ६५ टक्क्यांहून अधिक मालवाहतूक रस्त्यांमार्फत होत असल्याचे सांगून त्यांनी All India Transporters Welfare Association आणि Bombay Goods Transport Association यांसारख्या संघटनांसोबत समन्वयाने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील अनेक आरटीओ सेवा ऑनलाइन व फेसलेस करण्यात आल्याने पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. याशिवाय Messe Muenchen India आयोजित ‘Air Cargo India’ आणि ‘Transport Logistics India’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमुळे उद्योग नेते, धोरणकर्ते, जागतिक भागीदार आणि तंत्रज्ञान पुरवठादार एकाच व्यासपीठावर येत असून सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना मिळत आहे.
दरम्यान, “महाराष्ट्र जलद, स्मार्ट आणि जागतिक दर्जाची लॉजिस्टिक्स व्यवस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे ठामपणे सांगत मंत्री सरनाईक यांनी राज्याला देशाचे ‘लीडिंग लॉजिस्टिक्स गेटवे’ बनवण्याचा विश्वास व्यक्त केला.