मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये खचाखच गर्दी; धावत्या रेल्वेतून ३ प्रवाशी पडले, २ मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 16:01 IST2025-10-19T16:00:44+5:302025-10-19T16:01:14+5:30
दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे.

मुंबईहून बिहारला जाणाऱ्या ट्रेनमध्ये खचाखच गर्दी; धावत्या रेल्वेतून ३ प्रवाशी पडले, २ मृत्यू
नाशिक - मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारला जाणाऱ्या कर्मभूमि एक्सप्रेसमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या काही अंतरावर धावत्या रेल्वेतून ३ प्रवासी खाली पडले आहेत. ज्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून १ जण गंभीर जखमी आहे. हे प्रवासी दिवाळीसाठी गावी जात होते की, बिहार निवडणुकीत सहभागी होण्यासाठी जात होते हे अद्याप स्पष्ट नाही. सध्या या घटनेची चौकशी करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतले. माहितीनुसार, ही दुर्घटना भूसावळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅकवर घडली. यातील दोन मृतकांचे वय ३० ते ३५ यातील आहे. तिसऱ्या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सरकारी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या तिन्ही प्रवाशांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू असं या घटनेची नोंद केली आहे. प्राथमिक तपासात ट्रेनमध्ये असलेल्या खचाखच गर्दीमुळे हे प्रवासी खाली पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिवाळी सणामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्याशिवाय सध्या बिहारमध्ये निवडणुकीचे वारे वाहत आहे. त्यात हे प्रवासी दिवाळीसाठी गावी चालले आहेत की बिहार निवडणुकीत मतदानासाठी सहभागी व्हायला निघालेत याचा तपास केला जात आहे. बहुतांश प्रवाशी रेल्वेच्या जनरल बोगीतून प्रवास करत आहेत. मृत प्रवाशांचे सामान तपासले जात असून त्यातून त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस पथकाकडून परिसरातील सीसीटीव्ही आणि रेल्वे कर्मचारी, सहप्रवाशी यांच्याकडून माहिती घेणे सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई-लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बिहारला निघालेली कर्मभूमी एक्सप्रेस गाडी क्रमांक १२५४६ ही शनिवारी रात्री आठ वाजून १८ मिनिटांनी नाशिकरोड रेल्वे स्थानकावर आली. काही वेळाने ट्रेन तिथून रवाना झाली आणि रेल्वे स्थानकाजवळील पवारवाडी जवळील साईनाथ नगर येथील मारुती मंदिराजवळ ही दुर्दैवी घटना घडली. धावत्या रेल्वेतून तिघेजण खाली पडल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे साईनाथ नगर भागातील रेल्वे लाईनजवळ राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनी या अपघाताची माहिती नाशिकरोड रेल्वेस्थानक उपप्रबंधक कार्यालयात दिली. रेल्वे पोलीस व नाशिकरोड पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.