वाहतूक नियमांचे धडे शाळेतच द्यायला हवेत; नितीन गडकरींना कसली चिंता सतावतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2024 10:07 AM2024-01-08T10:07:58+5:302024-01-08T10:08:26+5:30

नागपूरमधील सर्व रस्ते मी सिमेंट काँक्रिटचे केले आहेत. त्यामुळे पुढच्या तीन पिढ्या या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत असं गडकरींनी म्हटलं.

Traffic rules should be taught in schools; Nana Patekar interviewed Nitin Gadkari | वाहतूक नियमांचे धडे शाळेतच द्यायला हवेत; नितीन गडकरींना कसली चिंता सतावतेय?

वाहतूक नियमांचे धडे शाळेतच द्यायला हवेत; नितीन गडकरींना कसली चिंता सतावतेय?

नागपूर - नियम कठोर केलेत, दंडही वाढवला आहे. कायदा कडक केला तरीही अपघात थांबले नाहीत. रस्ते अपघातात सातत्याने लोकांचा जीव जातोय याचा खेद वाटतो. येणाऱ्या पिढीला वाहतूक नियमांचे पालन करण्याचे धडे शालेय जीवनापासून द्यायला हवेत असा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिला आहे. रस्ते सुरक्षा अभियानातंर्गत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नितीन गडकरींची मुलाखत घेतली. त्यात गडकरींनी शाळेचे मुख्याध्यापक, स्वयंसेवी संस्था यांना एकत्र येत काम करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे. 

मुलाखतीत नाना पाटेकरांनी विचारले की, आपण दुर्घटना कमी होत नाही म्हणून जाहीरपणे खेद व्यक्त केला परंतु एक व्यक्ती म्हणून आपलं चुकतं कुठे? त्यावर गडकरींनी देशात दरवर्षी ५ लाखाहून अधिक अपघात होतात. १.६८ लाख लोकांचा मृत्यू होतो. मृतांपैकी ६५ टक्के १८ ते ३४ वयोगटातील युवा असतात. ही खूप दु:खद बाब आहे. जेव्हा कुठल्या कुटुंबातील युवकाचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या कुटुंबाचे फार मोठे नुकसान होते. अपघातांच्या कारणांचा शोध घेऊन उपाय केले जात आहे. त्यावर काम सुरू आहे. त्यासाठी ३६०० ब्लॅक स्पॉट शोधले आहेत असं त्यांनी सांगितले. 

तसेच नागपूरमधील सर्व रस्ते मी सिमेंट काँक्रिटचे केले आहेत. त्यामुळे पुढच्या तीन पिढ्या या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत. आम्ही आधीचे रस्ते उखडले आणि त्यावर ८ इंचाचे व्हाईट क्रॉपिंग केले. मात्र यामुळे नगरसेवक, इंजिनिअर नाराज होते. दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात. सगळीकडे आनंदी आनंद असतो. आता पर्मंनट रस्ते बनले तर ४० वर्ष या रस्त्यांसाठी मेन्टेन्स येत नाही. त्यामुळे आता आमचं काय असा प्रश्न त्यांना पडतो. मी पालकमंत्री असताना मला हायकोर्टात खेचलं होते. सिमेंट काँक्रिटचे रस्ते बांधतो म्हणून माझ्याविरोधात कोर्टात गेले होते. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे १९९९ साली बांधला. आज २४ वर्ष झाली त्यावर एखादा खड्डा दिसला का? असा सवाल नितीन गडकरींनी नानांना विचारला. तसेच रस्ते चांगले केले म्हणून गाड्यांचा वेग वाढला. नियमांचे पालन झाले पाहिजे त्यातून मार्ग काढला पाहिजे असं गडकरींनी म्हटलं. 

दरम्यान, मी तत्वे पालणारा राजकारणी माणूस आहे. मी वाहतुकीचे नियम कडक केले तेव्हा दक्षिणेतल्या प्रमुख पक्षांनी आम्ही तुमच्या विधेयकाला पाठिंबा देणार नाही असं स्पष्ट सांगितले. त्यानंतर प्रत्येकाशी बोलून त्यांची समजूत काढून मग हे विधेयक मंजूर करून घेतले. चांगले काम करणाऱ्याला सन्मान मिळाला पाहिजे आणि वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. सध्या मोठमोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जाते. मी ४५ वर्ष राजकारणात आहे. सुरुवातीला मी जॉर्ज फर्नाडिंस यांना पाहिले. ते संरक्षण मंत्री होते. काही सुरक्षा नाही. इतका साधेपणा मी पाहिला. मी अनेकदा मंत्री होतो. मला विमानतळावर कुणी पोहचवायला येत नाही. काही प्रथा बंद करायला हव्यात. लोकांनी आणि समाजाने बहिष्कृत केले तर बरे होईल असंही नितीन गडकरींनी म्हटलं. 

Web Title: Traffic rules should be taught in schools; Nana Patekar interviewed Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.