मीरा भाईंदर येथील बंददरम्यान वाहतूक पोलिसाचा शाळेतील विद्यार्थ्यांना माहितीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 22:19 IST2025-08-01T22:17:11+5:302025-08-01T22:19:05+5:30
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेका कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी अचानक बस सेवा बंद पाडल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले.

मीरा भाईंदर येथील बंददरम्यान वाहतूक पोलिसाचा शाळेतील विद्यार्थ्यांना माहितीचा हात
मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेका कर्मचाऱ्यांच्या संघटनेने शुक्रवारी अचानक बस सेवा बंद पाडल्याने विशेषतः विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. भाईंदर येथील बस स्टॉप वर बसच्या प्रतीक्षेत असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना पाहून कर्तव्यावरील वाहतूकचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चौधरी यांनी त्या विद्यार्थ्यांना चार रिक्षात बसवून शाळेत पाठवले. ह्या मदतीने विद्यार्थ्यांसह काही पालक व परिसरात उपस्थित नागरिकांना देखील चौधरी यांचे आभार मानले.
बस सेवा बंद पाडल्याने सकाळी व दुपारी शाळेत जाणाऱ्या तसेच महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल झाले. कारण पालिकेच्या बस मध्ये नेहमी जात असल्याने सवलतीचे तिकीट किंवा पास सोबत असतो. मात्र अचानक बस सेवा बंद झाल्याने शाळा- महाविद्यालयात जायचे कसे असा प्रश्न पडला. ज्यांच्या कडे पैसे होते त्यांनी रिक्षासाठी जास्त भाडे देऊन किंवा मिळेल ते वाहन पकडून शाळा - महाविद्यालय गाठले.
मात्र ज्या विद्यार्थ्यां कडे मोजकेच पैसे होते शिवाय आता जास्त पैसे देऊन शाळेत जाऊ मात्र शाळेतून परत येण्यासाठी पैसे शिल्लक राहणार नाहीत अश्या विवंचनेत देखील असंख्य विद्यार्थी सापडले. भाईंदर पश्चिम येथील शिवसेना गल्ली नाका जवळच्या बस स्टॉप वर शाळेत जाणारी लहान व मोठे अनेक विद्यार्थी पालिका बसची प्रतीक्षा करत ताटकळत होते. काही विद्यार्थ्यांचे पालक नेहमी प्रमाणे त्यांना बस स्टॉप वर सोडण्या साठी आले होते.
परंतु पालिकेची बस येण्याच्या प्रतीक्षेत अर्धा तास झाला तरी बस न आल्याने शाळेत उशीर होणार याची चिंता सतावत होती. त्यातच रिक्षाने जायचे तर जास्त पैसे लागतात व तेवढे पैसे देखील सोबत नव्हते. पालकांनी देखील मुलांना बस स्टॉप पर्यंत सोडायचे म्हणून पैसे आणले नव्हते.
शाळकरी विद्यार्थ्यांची घालमेल पाहून समोरच वाहतूक चौकीत असलेले सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चौधरी हे बस स्टॉप वर आले. आणि त्यांनी रिकाम्या रिक्षा थांबवून रिक्षा चालकांना शाळेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाईंदर सेकंडरी जवळील पालिका शाळेत सोडण्यास सांगितले. सुमारे चार रिक्षां मधून चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत पोहचवण्याचे काम केले.