पर्यटनाला मिळाला हिरवा कंदील; जलक्रीडा, नौकाविहारास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 07:09 IST2020-12-24T02:13:26+5:302020-12-24T07:09:48+5:30
Tourism : नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने पर्यटनस्थळे उघडण्याची परवानगी दिली. मात्र, जलक्रीडा, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्कचा त्यात समावेश नव्हता.

पर्यटनाला मिळाला हिरवा कंदील; जलक्रीडा, नौकाविहारास परवानगी
मुंबई : राज्यात कंटेनमेंट झोनबाहेरील जलक्रीडा, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क तसेच पर्यटनस्थळी इनडोअर मनोरंजन कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नाताळच्या सुट्टीत पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.
लॉकडाऊनमुळे दहा महिन्यांपासून राज्यातील सर्व पर्यटनस्थळे तसेच जलक्रीडा, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्क बंद असल्यामुळे लोकांना या गोष्टींचा आनंद घेता आला नाही. मिशन बीगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, पर्यटनाशी संबंधित या बाबींना परवानगी मिळालेली नव्हती. त्यामुळे शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी पर्यटनस्थळी जाणाऱ्यांना त्याचा आनंद घेता येत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारने पर्यटनस्थळे उघडण्याची परवानगी दिली. मात्र, जलक्रीडा, नौकाविहार, अॅम्युझमेंट पार्कचा त्यात समावेश नव्हता. त्यामुळे किमान नाताळपूर्वी तरी परवानगी मिळावी, अशी मागणी पर्यटक आणि हाॅटेलचालकांनी केली होती.
लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे सध्या कोकण आणि इतर पर्यटनस्थळी गर्दी होत असून, १ जानेवारीपर्यंत सर्व पर्यटनस्थळे गजबजून जाण्याची शक्यता आहे. रात्रीची संचारबंदी महापालिकांच्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादित असल्याने कोकणातील पर्यटनावर त्याचा परिणाम होणार नाही.