मुंबई : मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्याच्या काही भागात शनिवारी सकाळी आणि संध्याकाळीही पावसाच्या मध्यम सरी कोसळल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. आज, रविवारीही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी वर्तविला आहे.
शनिवारी सकाळी मुंबईकर जागे झाले तेव्हा आकाश बऱ्यापैकी काळवंडलेले होते. जोरदार पाऊस कोसळेल, असे चित्र होते. वातावरण पावसाळलेले होते. मुंबई परिसरात सकाळी ७ ते १० दरम्यान काही ठिकाणी हलका पाऊस झाला. सकाळी १० नंतर मात्र आकाश मोकळे होऊन सूर्य तळपू लागला. उन्हाचे चटके आणि उकाड्याने मुंबईकरांना हैराण केले. मात्र संध्याकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि घरी परतणाऱ्यांची त्रेधा उडवली.