ठग्ज ऑफ महाराष्ट्र! देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंविरोधात विरोधी पक्षांची हटके पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 16:25 IST2018-11-18T13:40:48+5:302018-11-18T16:25:40+5:30
विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरमधून राज्य सरकारवर बोचरी टीका करण्यात आली आहे.

ठग्ज ऑफ महाराष्ट्र! देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेंविरोधात विरोधी पक्षांची हटके पोस्टरबाजी
मुंबई - विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारविरोधात भक्कम मोर्चेबांधणी करण्यासाठी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक रविवारी मुंबईत सुरू झाली. मात्र या बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेसाठी लावण्यात आलेले पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ठग्स ऑफ हिंदुस्थानच्या धर्तीवर विरोधी पक्षांनी ठग ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र असे नाव देऊन हे पोस्टर लावले आहे. त्यामध्ये आमीर खानच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमिताभ बच्चन यांच्या जागी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र लावून त्याखाली 'ठग ऑफ महाराष्ट्र', 'ठगबाजीची चार वर्षे' असे बोचरे शीर्षक दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची छायाचित्रे लावलेल्या या पोस्टरमधून राज्य सरकारवर बोचरी टीका करण्यात आली आहे. तसेच सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या ठगबाजीचा पाढाच वाचण्यात आला आहे. त्यामध्ये जनतेशी ठगबाजी, औद्योगिक ठगबाजी, भावनिक ठगबाजी, ग्राहकांशी ठगबाजी, शेतकऱ्यांशी ठगबाजी आणि बेरोजगारांशी ठगबाजी, अशे विविध मथळे देऊन सरकारचे अपयश अधोरेखित करण्यात आले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू असलेल्या विरोधी पक्षाच्या गटनेत्यांच्या बैठकीला विखे पाटील, धनंजय मुंडे, पृथ्वीराज चव्हाण, अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गणपतराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, अबू आसिम आझमी, बसवराज पाटील, हेमंत टकले, जिवा पांडू गावीत, कपिल पाटील, भाई जगताप, जितेंद्र आव्हाड, विद्याताई चव्हाण आदी नेते उपस्थित आहेत.