“जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एक स्टंट असू शकतो”; विधानभवन उडवायच्या धमकीवर विरोधकांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 12:26 IST2026-03-12T12:26:18+5:302026-03-12T12:26:18+5:30
Raju Shetti News: सरकार अडचणीत येऊ लागले की अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या जात असतात, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.

“जनतेचे लक्ष विचलित करण्याचा एक स्टंट असू शकतो”; विधानभवन उडवायच्या धमकीवर विरोधकांची टीका
Raju Shetti News: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे.यातच मुंबईतील विधानभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आली असून, या घटनेनंतर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण विधान भवन परिसराचा ताबा घेतला आहे. केवळ विधानसभा नाही, तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो यांबाबतही धमकीचा मेल आला आहे. यावर विरोधकांनी टीका केली असून, हा एक स्टंट असू शकतो. गंभीर समस्येपासून जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रकार असू शकतो, असा दावा करत विरोधकांनी टीका केली आहे.
सरकार अडचणीत येऊ लागले की अशा प्रकारच्या घटना घडवून आणल्या जात असतात. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार नाही आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला कधीच समोर आणले जाणार नाही, असा दावा करत शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.
अंधभक्त असलेला एखादा व्यक्ती असू शकतो
या घटनेमागे अंधभक्त असलेला एखादा व्यक्ती असू शकतो. देशातील इतर महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असावा, असा दावा राजू शेट्टी यांनी केला. तसेच एपस्टीन फाइलमध्ये देशातील अनेक नेत्यांची नावे समोर आली आहेत. तसेच सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेला गॅस तुटवडा आणि इतर गंभीर समस्यांकडून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी हा केवळ एक स्टंट असू शकतो. असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, विधिमंडळाचे कामकाज सुरू असल्याने विधान भवन परिसरात मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांची मोठी गर्दी असते. अशा वेळी मिळालेल्या या धमकीमुळे विधान भवनाची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी हा ईमेल कोठून आला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही धमकी केवळ अफवा आहे की घातपाताचा प्रयत्न, याचा शोध पोलीस घेत आहेत.