प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:20 IST2019-09-24T13:20:49+5:302019-09-24T13:20:49+5:30
भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे.

प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?
- रवींद्र देशमुख
मुंबई - विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राजकीय पक्षातील घडामोडींना वेग आला आहे. मात्र निवडणुकीच्या तयारीतही शिवसेना-भाजप युती आघाडीवर दिसत असून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अद्याप पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. आघाडीत राष्ट्रवादीने हालचाली सुरू केल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार मैदानात उतरले आहे. मात्र काँग्रेसची सुस्ती गेली नसल्याचे दिसून येते. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती झाली असली तरी काँग्रेस नेत्यांच्या नजरा अशोक चव्हाण यांच्याकडेच लागल्याचे चित्र काँग्रेसमध्ये आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजीनामा मंजूर करायचा का, असा पेचही काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. परंतु, अखेरीस चव्हाण यांना कार्यमुक्त करण्यात आले. तर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपविण्यात आली.
थोरात यांनी धडाक्यात सुरुवात केली असली तरी पक्ष संघटनाच्या बाबतीत ते नगर जिल्ह्यातच अडकून पडले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. किंबहुना काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनीही थोरात केवळ संगमनेरचे प्रदेशाध्यक्ष आहे का असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे काँग्रेसमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. चव्हाण यांची नांदेडवर असलेली पकड काही प्रमाणात कमजोर झाली असली तरी, विधानसभेला नांदेडकर त्यांच्या पाठिशी राहिल अशी खात्री राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्यभरात पक्षाचा प्रचार करण्यात अशोक चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. अशा स्थितीत राज्य काँग्रेसचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडेच असावे असं काँग्रेसमधील नेत्यांना वाटत आहे.