"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 14:17 IST2025-12-15T14:16:49+5:302025-12-15T14:17:58+5:30
विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांकडून दिलेल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त केला आहे.

"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावर एक विधान केले. त्यांच्या या विधानावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संताप व्यक्त करत थेट इशारा दिला आहे. 'गैरप्रकार असतील तर कारवाई करा; पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका', असे म्हणत रामदास आठवले यांनी यांनी या मुद्द्यावर भूमिका मांडली.
पी.एचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीचा मुद्दा विधानसभेत चर्चेला आला होता. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी '४२-४५ हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात ५-५ लोक पी.एचडीला प्रवेश घेत आहेत', असे विधान केले होते. संशोधक विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या संशोधनाबद्दलही त्यांनी शंका उपस्थित केली होती.
रामदास आठवले म्हणाले, 'दान किंवा भीक नाही'
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक पोस्ट करत म्हटले आहे की, "अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही; ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे."
"जर एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे. ही परिस्थिती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे. आत्मसन्मान, समता आणि संविधानाने दिलेला हक्क जपण्यासाठी आहे", अशा शब्दात आठवलेंनी पवारांना सुनावले.
...पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका; आठवलेंचा इशारा
रामदास आठवलेंनी पुढे म्हटले आहे की, "कोणतेही शिक्षण कमी–जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही."
"आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. गैरप्रकार असतील तर कारवाई करा; पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका! विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही", असा इशाराही रामदास आठवलेंनी दिला आहे.