Maharashtra News: "देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या बहुमताने या सुसंस्कृत राज्याची सत्ता मिळाली आहे. त्यांनी राज्य चांगलं चालवावं. आम्हाला विश्वासात घेऊन राज्य चालवण्यास आमचा त्यांना पाठिंबा असेल", असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना म्हणाले. त्यांच्या याच मुद्द्यावर बोट ठेवत खासदार संजय राऊत यांनी उलट सवाल केला. खासदार राऊत यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आणि 'राज ठाकरे त्यांना अशा उत्तम कामगिरीबद्दल पाठिंबा देणार आहेत', अशी उपरोधिक टीका केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील अर्धामसला गावात धार्मिक स्थळामध्ये शनिवारी मध्यरात्री अडीच वाजता दोन समाजकंटकांनी जिलेटिन कांड्यांचा स्फोट घडवून आणला.
हेही वाचा >>सत्ता मिळालीय, राज्य चांगलं चालवा; राज ठाकरेंच्या आवाहनावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
या घटनेनंतर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात संशयित आरोपी जिलेटिनच्या कांड्यासह दिसत आहेत. हा व्हिडीओ काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट केला आहे. हाच व्हिडीओ रिपोस्ट करत खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले आहे.
संजय राऊतांची पोस्ट काय?
"हा आहे फडणवीस यांचा महाराष्ट्र! राज ठाकरे त्याना अशा उत्तम कामगिरी बद्दल पाठिंबा देणार आहेत", असा सवाल संजय राऊतांनी व्हिडीओ रिपोस्ट करत राज ठाकरेंना केला आहे.
बीड जिल्ह्यातील घटना काय? अर्धमसला गावात शनिवारी संदल मिरवणुकीत विजय रामू गव्हाणे व श्रीराम अशोक सागडे यांनी 'येथे धार्मिक स्थळ का बांधले, हे स्थळ पाडावे लागेल', असे म्हणत वाद घातला. काही लोकांनी त्यांची समजूत काढल्याने ते निघून गेले. परंतु, रात्री अडीचच्या सुमारास दोघांनी जिलेटिन कांड्या ठेवून स्फोट घडवून आणला. त्यानंतर हे दोघेही पळून गेले.
स्फोट घडवून आणल्यानंतर विजय व श्रीराम हे दोन्ही आरोपी बीड तालुक्यातील सिंपेगाव या मावशीच्या शेतात गेले. तेथे मक्याच्या पिकात लपले असतानाच पोलिसांनी अवघ्या तीन तासांत आरोपींना पकडले.