हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 10:47 IST2025-07-21T10:47:01+5:302025-07-21T10:47:54+5:30

पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा अचानक ५०-६० जण आले आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू बोलतो, पत्ते उधळतो असं सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले. 

This attack was pre-planned, on the orders of Sunil Tatkare...; Vijay Ghadge Patil's big claim on Suraj Chavan | हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा

हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा

लातूर - राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीचे निवेदन देणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून आज छावा संघटनेने लातूर बंदची हाक दिली आहे. या प्रकरणी मारहाण करणारे सूरज चव्हाण यांनी माफी मागितली असली तरी ही मारहाण प्री प्लॅनिंग होती. निवेदन दिल्यानंतर अर्ध्या तासाने ५०-६० जणांनी येऊन मारहाण केली असा दावा छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांनी केला आहे. 

नेमकं काय घडले?

याबाबत छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील म्हणाले की, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी याआधीही शेतकरीविरोधात विधाने केली होती. राज्याच्या विधानसभा सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. या घटनेचा निषेध म्हणून ते ज्या पक्षातून आलेत त्यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेंना निवेदन द्यायला गेलो. कृषिमंत्री म्हणून त्यांना या पदावर ठेवू नका अशी मागणी करत होतो. तुम्ही या पदावरून हटवा असं सांगत आम्ही प्राथमिक स्वरुपात पत्ते दिले आणि कोकाटेंना घरी पाठवा असं सांगितले. कृषिमंत्री पदाची थट्टा करत होते असं सांगितले. तटकरेंनी हे ऐकून घेतले. त्यानंतर निवेदन दिल्यानंतर आम्ही निघून आलो. दुसऱ्या सर्किट हाऊसला गेलो होतो. तिथे माझ्या सहकाऱ्यांसोबत बसलो होतो. पत्रकारांसोबत चर्चा सुरू होती तेव्हा अचानक ५०-६० जण आले आणि त्यांनी आमच्या नेत्याला तू बोलतो, पत्ते उधळतो असं सांगत मारहाण करण्यास सुरुवात केली असं त्यांनी सांगितले. 

तसेच एवढी मारहाण केली की आम्हाला सत्तेचा माज काय असतो हे राष्ट्रवादीच्या गुंडांकडून पाहायला मिळाले. आम्ही माहिती घेतली तेव्हा कळलं, निवेदन देऊन आल्यानंतर अर्ध्या तासाने हे लोक आमच्याकडे आले. या लोकांची आणि तटकरेंची चर्चा झाली. चर्चा झाल्यानंतर प्री प्लॅन केला. लाथा-बुक्क्यांनी उत्तर द्यायचे असे त्यांनी ठरवले आणि मारहाण केली. या राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायचे नाही, निवेदन द्यायचे नाही. सभागृहात पत्ते खेळणारा मंत्री चालतो. आंदोलनाचा भाग म्हणून प्रतिकात्मक पत्ते दिले म्हणून इतकी मिरची झोंबली. हा हल्ला पूर्वनियोजित घडवण्यात आला. तटकरेंच्या सांगण्यावरून सूरज चव्हाणने मारहाण केली. माझा जीव गेला तरी शेतकऱ्यांची बाजू सोडणार नाही असं विजय घाडगे पाटील यांनी म्हटलं. 

सूरज चव्हाणनं मागितली माफी

दरम्यान, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांनी सांगितले आहे. 
 

Web Title: This attack was pre-planned, on the orders of Sunil Tatkare...; Vijay Ghadge Patil's big claim on Suraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.