‘मेडिकल कॉलेज’मध्ये रॅगिंगची नशा; महाविद्यालयांच्या विभाग प्रमुखांना दिवाळी गिफ्ट, अन् बरेच काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 07:15 IST2025-05-04T07:14:45+5:302025-05-04T07:15:01+5:30
पुणे येथील बी.जे.मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगप्रकरणी तीन निवासी डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे.

‘मेडिकल कॉलेज’मध्ये रॅगिंगची नशा; महाविद्यालयांच्या विभाग प्रमुखांना दिवाळी गिफ्ट, अन् बरेच काही...
डॉ. प्रवीण शिनगारे
माजी संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय
पाश्चिमात्य देशामध्ये सामाजिकदृष्ट्या नवीन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी वरिष्ठ विद्यार्थ्यांनी करावयाची कार्यप्रणाली या उद्देशाने रॅगिंगची प्रथा सुरू झाली. महाविद्यालयात येणारा नवीन विद्यार्थी हा सुरुवातीला लाजराबुजरा असतो. वरिष्ठ विद्यार्थ्यांशी तो बोलण्यास घाबरतो. त्याला नवे मित्र मिळत नाहीत. यावर मात करण्याच्या चांगल्या उद्देशाने ही प्रथा सुरू झाली होती. पाश्चिमात्य देशांतील ही प्रथा भारतात आली.
साधारणपणे १९७० च्या दशकापर्यंत ही प्रथा भारतातील सर्व व्यावसायिक महाविद्यालयांत सुरू झाली; परंतु वैद्यकीय महाविद्यालयांत त्याचे गंभीर परिणाम दिसू लागले. सुरुवातीच्या काळात गाणी गायला लावणे, नकला करावयास लावणे, जर्नल लिहून घेणे, होमवर्क पूर्ण करून घेणे यापासून ते अश्लील बोलायला लावणे. सुंदर अभिनेत्रींबद्दल बोलायला सांगणे इत्यादी सामान्य पातळीवर असणारे रॅगिंग शारीरिक, आर्थिक आणि मानसिक पातळीवर पोहोचले. सिनियर विद्यार्थ्यांनी दारू पिऊन रॅगिंग करणे आता नित्याचे झाले आहे. या त्रासाबद्दल प्रशासनाकडे दाद मागितल्यास न्याय मिळणे दूरच; पण तक्रार का केली म्हणून रॅगिंगचा त्रास दुप्पट होतो. कारण या कृतीबद्दल कठोर कायदे नव्हते.
हरियाणात २००९ मध्ये समर काचरो या विद्यार्थ्याने रॅगिंगबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर वरिष्ठ विद्यार्थ्यांनी दारू पिऊन त्याला वसतिगृहात मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरला. सर्वोच्च न्यायालय, एमसीआय, यूजीसी, मानवाधिकार आणि मीडिया या सगळ्यांनीच गंभीर दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार केंद्र शासनाने ‘सीबीआय’चे निवृत्त संचालक डॉ. आर. के. राघवन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. समितीच्या अहवालानुसार मार्गदर्शक तत्त्वे, केंद्र सरकारचा कायदा, महाराष्ट्राचा कायदा, विद्यापीठ अनुदान आयोगाची नियमावली व भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची (नॅशनल मेडिकल कमिशन) मार्गदर्शक तत्त्वे इत्यादी अमलात येऊनही रॅगिंग कमी झालेली नाही. हे सर्व कायदे, नियम, बंधने असूनही मुंबईच्या एका वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. पायल तडवी या मुलीने रॅगिंगच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली. रॅगिंगमुळे आणखी किती बळी जाण्याची आपण वाट पाहणार आहोत? रॅगिंगचे प्रकार का कमी होत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर एकच आहे ते म्हणजे नियमावलीची योग्य अंमलबजावणी न करणे किंवा ती करण्यास घाबरणे.
देशभर वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा ‘नीट-पीजी’द्वारे गुणवत्तेवर भरल्या जातात. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयात ऑल इंडिया कोट्यातून विविध राज्यांचे, विविध संस्कृतीचे विद्यार्थी प्रवेश घेतात. राखीव जागांमधून विविध सामाजिक स्तरांवरचे गरीब, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थी प्रवेश घेतात. ते सर्व एकाच महाविद्यालयात एकाच छताखाली शिकतात. या सर्वांमध्ये परस्पर संवाद निर्माण व्हावा, ही अपेक्षा अँटी रॅगिंग सेलकडून असते. रॅगिंगबद्दल तक्रार केल्यास त्या विद्यार्थ्याला ‘सहन कर, तू पण लवकरच सिनियर होणार आहेस’, असा सल्ला दिला जातो. पूर्वी ‘तक्रार करण्याने किती नुकसान झाले?’ याचे उदाहरण दिले जाते.
रॅगिंग करणाऱ्याला पथकप्रमुख डॉक्टरांचा सपोर्ट आहे, विभाप्रमुखांच्या मर्जीतला आहे. त्याच्या राजकीय आणि आर्थिक स्थितीमुळे अधिष्ठातासुद्धा त्याच्यावर कारवाई करणार नाहीत, याची खात्री ज्युनियर विद्यार्थ्यांस असते. त्यामुळे तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतो. अँटी रॅगिंग कायद्याचे सर्व नियम पाळलेले दिसतात. मात्र, एकच नियम पाळला गेला नाही. त्यामुळे रॅगिंगचे प्रमाण वाढत आहे.
रॅगिंगबद्दल शिक्षा झाली तरी तिचा फेरविचार होऊ शकतो याची खात्री रॅगिंग करणाऱ्याला असते. हरियाणात रॅगिंग करणाऱ्या ४ विद्यार्थ्यांना ४ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली होती. सलग ३ वर्षे तुरुंगात राहिल्यावर त्यांच्यामध्ये निश्चितच सुधारणा झाली. त्यांना पश्चाताप झाला, असे दिसून आल्यावर शासनाने त्यांची उर्वरित शिक्षा माफ केली. त्यामुळे केवळ राजकीय किवा आर्थिक पाठबळाने शिक्षा माफ होऊ नये तर खरोखरच पश्चाताप झालेला दिसला पाहिजे. अन्यथा रॅगिंग अशीच सुरू राहील आणि बळी जात राहतील.
कारवाईची भीती नाही म्हणून...
रॅगिंगची तक्रार येऊनही पथकप्रमुख, विभागप्रमुख व अधिष्ठाता यांनी कार्यवाही न केल्यास त्यांच्यावर संचालक/सचिवांनी कडक कारवाई करावी, अशी तरतूद नियमात आहे. या तरतुदीची खरोखरच अंमलबजावणी केल्यास रॅगिंगला निश्चितच आळा बसेल. हे सर्व अधिकारी आपल्यावर होणाऱ्या कारवाईच्या भीतीने दक्ष राहतील. त्यामुळे तातडीने ज्युनियरला न्याय देण्याचा प्रयत्न करतील. राज्यामध्ये बहुतांशी केसेसमध्ये रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अल्प प्रमाणात कार्यवाही झालेली आहे.
दिवाळीत गिफ्ट स्वीकारणे
वैद्यकीय महाविद्यालयात काही विभागांमध्ये दरवर्षी नियमितपणे न चुकता रॅगिंग होते. रॅगिंग झालेले हेच विद्यार्थी दुसऱ्या वर्षी नवीन विद्यार्थ्यांवर रॅगिंग करतात. हे सर्व प्रथकप्रमुख किंवा विभागप्रमुख आनंदाने डोळे बंद करून पाहत असतात. रॅगिंग करणाऱ्या श्रीमंत विद्यार्थ्यांकडून पार्टी घेणे, महागडी प्रेझेंट स्वीकारणे, दिवाळीत (सोन्याचे) गिफ्ट स्वीकारणे, त्यांच्या फार्महाऊसवर जाणे, त्यांच्या खर्चाने पिकनिकला जाणे इत्यादी उद्योग पथकप्रमुख किंवा विभागप्रमुखांचे सुरू असतात. ज्या विभागात असे उद्योग नाहीत त्या विभागातील विद्यार्थी रॅगिंग करण्यास धजावत नाहीत.