राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2025 09:27 IST2025-04-20T09:25:01+5:302025-04-20T09:27:04+5:30
Raj Thackeray & Uddhav Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. त्यातच पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटही कमालीचा आक्रमक झालेला आहे. यादरम्यान, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एकत्र येऊ शकतो, असे संकेत मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी दिले असून, उद्धव ठाकरे यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांचा उदय होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात असतानाच मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.
महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजे असं नाही. मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकतं. जसे तामिळनाडूमध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात, तसेच मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे? फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे, असं मत संदीप देशपांडे यांनी मांडलं आहे. संदीप देशपांडे यांच्या या विधानामुळे मनसे आणि शिवसेना ठाकरे गट आगामी काळात राजकीयदृष्ट्या एकत्रिक येणार की केवळ मराठी आणि महाराष्ट्राच्या मुद्द्यांवर एकत्र लढणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाराष्ट्रासाठीएकत्र येणं म्हणजे निवडणुकीसाठीच एकत्र यायला पाहिजेअसं नाही मराठी महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्यापुरतं सुद्धा एकत्र येता येऊ शकत जसे तामिळनाडू मध्ये कावेरीच्या मुद्द्यावर तामिळ पक्ष एकत्र येतात तसं मराठी पक्षांनी यायला काय हरकत आहे फक्त निवडणूक हा संकुचित विचार आहे
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 20, 2025
दरम्यान, राज ठाकरे यांनी शुक्रवारी महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत मनोमिलनाचे संकेत दिले होते. महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी आमच्यातील वाद, आमच्यातील भांडणे, या सगळ्या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे यात मला फार कठीण गोष्ट वाटत नाही, हा फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणे आवश्यक आहे. मी पाहतोच आहे. माझे तर असे म्हणणे आहे की सगळ्या महाराष्ट्रातील राजकीय पक्षातील सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा. मी आयत्या पिठावर रेघोट्या मारत नाही, असे राज ठाकरे म्हणाले होते.
तर राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते की, किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा महाराष्ट्र आणि मराठीच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो आहे. पण माझी एक अट आहे.. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे आगत स्वागत मी करणार नाही त्यांच्या घरी जाणार नाही, त्याच्या पंगतीला मी बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी माझ्याकडून भांडणे नव्हतीच कोणाशी, मिटवून टाकली चला, असे त्यांनी सांगितले होते.