कर्नाटक पोलिसांनी नाकारलेला मृतदेह अखेर क-हाडात विसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 23:04 IST2020-05-19T22:22:02+5:302020-05-19T23:04:27+5:30
एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था... सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर क-हाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था,’ अशी भावनिक प्रतिक्रिया कºहाडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांनी दिली.

कर्नाटक पोलिसांनी नाकारलेला मृतदेह अखेर क-हाडात विसावला
क-हाड : मृत्यूनंतर यातना संपतात, असं म्हटलं जातं; पण गुजरातमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या देहाला मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागल्या. दोन दिवस दोन राज्यांमध्ये फिरणारा हा मृतदेह सोमवारी रात्री अखेर महाराष्ट्रात पोहोचला आणि क-हाडच्या मातीत या देहाचा दफनविधी पार पडला.
'असिफ लतिफ सैय्यद (वय ५४) असे त्या मृत व्यक्तीचे नाव आहे. असिफ सैय्यद हे कामानिमित्त गुजरातमधील भरूचमध्ये राहण्यास होते. कर्नाटकातील कारवार हे त्यांचे मूळगाव. मात्र, कामानिमित्त असिफ भरूचमध्येच एकटेच राहत होते. रविवारी (दि.१७) त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. जवळ कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तेथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक यांनीच शवविच्छेदन आणि इतर कागदोपत्री सोपस्कार पार पाडले. त्यानंतर रुग्णवाहिका चालक मकबूलसह ते भरूचमधून असिफ सैयद यांचा मृतदेह घेऊन कारवारला जाण्यासाठी निघाले. सोबत आवश्यक ती कागदपत्रे असल्यामुळे वाटेत त्यांना कोणीही अडविले नाही. मात्र, सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडविली.
सामाजिक कार्यकर्ते मुबारक व रुग्णवाहिका चालक मकबुल यांनी सर्व कागदपत्रे पोलिसांना दाखवली. तसेच सत्यस्थिती सांगितली. मात्र, पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता रुग्णवाहिका परत गुजरातला न्या, अशी आडमुठी भूमिका घेतली. अखेर त्या दोघांनी कोल्हापूरच्या मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला आणि घटनेची कल्पना दिली. गणी आजरेकर यांनी तातडीने कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना फोन करून ही घटना सांगितली. अखेर मृत असिफ सैय्यद यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेऊन कोल्हापूरच्या बागल चौकातील कब्रस्तानात मृतदेहाचा दफनविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रुग्णवाहिका कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. मात्र, किणी टोलनाक्यावर पोलिसांनी ही रुग्णवाहिका अडवली. त्यांनी रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस वाहन पाठवून ती रुग्णवाहिका पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणून सोडली. या सर्व प्रकारानंतर व्यथित झालेल्या मकबूल आणि मुबारक यांनी गणी आजरेकर यांच्याशी संपर्क साधला.
सर्वच वाटा बंद झाल्यामुळे अखेर आजरेकर यांनी क-हाडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांच्याशी संपर्क साधला.
नगरसेवक पटवेकर यांनी क-हाडातील पोलिसांशी चर्चा करून मुबारक आणि मकबूल यांना असिफ सैयद यांच्या पार्थिवासह क-हाडला येण्यास सांगितले. कोल्हापूरचे मौलाना मुबीन, गणी आजरेकर यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर असिफ सैय्यद यांचा मृतदेह मंगळवारी पहाटे क-हाडमध्ये पोहोचला. त्यानंतर इस्लाम रितीरिवाजाप्रमाणे क-हाडच्या कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. यासाठी क-हाडचे हाजी बरकत पटवेगार, साबीर मुल्ला, इरफान सैयद, झाकीर शेख यांनीही सहकार्य केले.
- आजरेकर यांनी तेथील सहायक पोलिस निरीक्षक अनिल कोळेकर यांच्याशी मी बोलतो, त्यांना फोन द्या असे सांगितले .पण कोळेकर यांनी त्यांचा फोन तर घेतला नाहीच, उलट मुबारक आणि मकबूल यांना रूग्णवाहिकेत बसवून पाठीमागे एक पोलीस वाहन पाठवून देत त्यांना पेठवडगाव पोलीस ठाण्याच्या ह्ददी बाहेर जाण्यास भाग पाडले .पुढे सांगली जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील एका पोलीस चौकी च्या दारात थांबून त्यांनी पुन्हा आजरेकर यांच्याशी संपर्क साधला .त्यांना हकीकत सांगितली .आजरेकर यांनी जिल्हा पोलिस प्रमुख देशमुख यांना याबाबत सांगितले .देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक कोळेकर यांना विचारणा केली असता त्यांनी चक्क आपल्या वरिष्ठांची दिशाभूल करून वेळ मारून नेली
एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था...
सध्या रमजान महिना सुरू आहे. या महिन्यात हेच पवित्र काम आमच्या हातून व्हायचे असावे. असिफ सैय्यद यांचे कोणीही नातेवाईक नसताना त्यांच्या मृतदेहावर कºहाडात दफनविधी करावा लागला. ‘एक नेक काम रह गया था, शायद वो हमारे नसीब मे था,’ अशी भावनिक प्रतिक्रिया क-हाडचे नगरसेवक फारूख पटवेकर यांनी दिली.