महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 08:57 IST2024-12-25T08:57:23+5:302024-12-25T08:57:33+5:30

निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

There is no tampering with the electoral rolls in Maharashtra Election Commission clarifies | महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

महाराष्ट्रातील मतदार याद्यांत कोणताही घोळ झालेला नाही; काँग्रेसला ६० पानी उत्तर

चंद्रशेखर बर्वे 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने केलेले सर्व आरोप मंगळवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळून लावले. जवळपास ५० मतदारसंघांत ५० हजारांपेक्षा अधिक नावे बेकायदेशीरपणे मतदार याद्यांमध्ये समाविष्ट केल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक दिलेल्या तब्बल ६० पानांच्या उत्तरात काँग्रेसचे सर्व आरोप मुद्देनिहाय फेटाळून लावले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदार यादीत बेकायदेशीरपणे नावे जोडली गेली नाहीत किंवा वगळण्यात आली नाहीत. मतदार याद्यांमध्ये कोणताही घोळ झालेला नाही, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्र व हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसने ईव्हीएम आणि मतदार याद्यांवर शंका उपस्थित केली होती. महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी वाढवून दाखविली जात आहे. सायंकाळी पाच वाजता संपलेल्या मतदानाची आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात मोठी तफावत आहे, असे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. दरम्यान, सायंकाळी पाच वाजेच्या मतदान आकडेवारीची तुलना अंतिम आकडेवारीशी करणे योग्य नाही, असे निवडणूक आयोगाने काँग्रेसला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.

काय म्हटले आयोगाने? 

सायंकाळी ५ ते पावणेबारा या वेळेत मतदानात वाढ होणे एक सामान्य बाब आहे. कारण, यादरम्यान मतदानाच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू असते. 

वास्तविक, मतदान आणि मतांची मोजणी यात किंचितसा फरक आढळून येऊ शकतो, असेही आयोगाने म्हटले. 

कारण, एकूण मतदानाची माहिती असलेला फॉर्म १७-सी हा प्रत्येक उमेदवाराच्या प्रतिनिधीला दिला जातो. एवढेच नव्हेतर, मतदार यादी तयार करताना सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

यामुळे मतदारांची नावे काढण्यात कोणत्याही प्रकारची अनियमितता झाली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले. ५० मतदारसंघांत याद्यांमध्ये ५० हजार मतदारांची नावे अतिशय हुशारीने जोडण्यात आली. त्यामुळे यापैकी ४७ मतदारसंघांत भाजपचा विजय झाला, असा आरोप काँग्रेसने केला होता.
 

Web Title: There is no tampering with the electoral rolls in Maharashtra Election Commission clarifies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.