"आमच्या विचारधारेत फरक नाही..."; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2024 15:38 IST2024-03-09T15:36:34+5:302024-03-09T15:38:03+5:30
मनसेची प्रादेशिक भूमिका आम्हालाही मान्य, भाजपा-मनसे युतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

"आमच्या विचारधारेत फरक नाही..."; मनसे-भाजपा युतीवर देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
नागपूर - Devendra Fadnavis on MNS-BJP Alliance ( Marathi News ) आगामी काळात मनसे-भाजपा एकत्र येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. निवडणुकीचे काय निर्णय घ्यायचे हे लवकरच सांगेन, तोपर्यंत संयम ठेवा असं सांगत राज ठाकरे यांनीही आजच्या सभेत सस्पेन्स कायम ठेवला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना मनसे-भाजपा युतीवर सूचक विधान केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेने जी काही व्यापक भूमिका घेतली आहे ती आमच्या विचारांशी विसंगत नाही. क्षेत्रीय अस्मिता ही आम्हाला मान्यच आहे. महाराष्ट्रात राहून मराठी माणसांबद्दल बोलणे हे योग्यच आहे. मराठी माणसांच्या हक्कासोबत त्यांनी जी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे त्यामुळे मनसे-भाजपा यांच्यात फारसं अंतर राहिलेले नाही. बाकी निवडणुकीत काय होईल हे सांगता येत नाही. जे काही आहे चर्चेवर होईल. योग्य वेळी योग्य गोष्टी होत असतात असं त्यांनी म्हटलं आहे.
तर दिल्लीत बैठक सकारात्मक झाली आहे. एकाच बैठकीत सगळे निर्णय होतील असं नाही. परंतु ८० टक्के काम कालच्या बैठकीत झाले आहे. २० टक्के काम आमचं सुरू आहे. तेदेखील फोनवरून होत आहे. लवकरच सर्वकाही स्पष्ट होईल असं सांगत देवेंद्र फडणवीसांनी महायुतीच्या जागावाटपावर भाष्य केले आहे.
दरम्यान, भाजपाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रात लढवायच्या आहेत तर एकनाथ शिंदे-अजित पवार हेदेखील जागांवरील दावा सोडायला तयार नाहीत. अशातच शिंदे-फडणवीस-अजितदादा यांना दिल्लीत बैठकीला बोलावण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरा अमित शाह यांच्या निवासस्थानी या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनुसार, महाराष्ट्रातील ४८ पैकी ३० हून अधिक जागा भाजपा लढवणार आहे तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला १० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ६-८ जागा देण्याची शक्यता आहे. दक्षिण मुंबईची जागा शिवसेना भाजपाला सोडण्यास तयार आहे. एनडीएने महाराष्ट्रात ४५ जागा जिंकण्याचे टार्गेट ठेवले आहे. रात्री १ च्या सुमारात हे तिन्ही नेते शाह यांच्या बंगल्यातून बाहेर पडताना दिसले. शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता या बैठकीला सुरुवात झाली होती.