जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 11:20 IST2025-12-20T11:14:01+5:302025-12-20T11:20:45+5:30
शहरात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने महापालिकेत आम्हीच 'बाहुबली' असे सांगत कमी जागा नकोत असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे

जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
अहिल्यानगर - महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहराच्या राजकारणात सत्तासमीकरणे तापू लागली आहेत. वरवर सेना, भाजप-राष्ट्रवादी युती होणार असल्याचे संकेत दिले जात असले, तरी प्रत्यक्षात जागावाटपाच्या चर्चेत एकमत होत होताना दिसत नाही. विशेषतः विद्यमान जागांवर कोणतीही तडजोड नको, या भूमिकेवर शिंदेसेना ठाम आहे. मात्र राष्ट्रवादी, भाजपकडून एवढ्या जागा देण्यास नकार दिला जात असून 'संख्याबळाइतकीच राजकीय ताकद महत्त्वाची' असा अप्रत्यक्ष सूर लावला जात आहे. त्यामुळे शिंदेसेना युतीत राहणार की, स्वतंत्र रणशिंग फुंकणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
२०१८ च्या महापालिका निवडणुकीत एकत्रित शिवसेनेने ६८ पैकी २४ जागा जिंकत सर्वाधिक यश मिळविले होते. गेल्या दोन, तीन वर्षात घडलेल्या मोठ्या राजकीय उलथापालथींनी चित्र पूर्णपणे बदलले आहे. सेनेच्या २४ पैकी एक जागा तांत्रिक कारणामुळे रद्द झाली. विद्यमान नगरसेवक अनिल बोरुडे भाजपामध्ये गेले तर योगीराज गाडे ठाकरे गटात कायम राहिले. बसपाकडून निवडून आलेल्या अश्विनी जाधव शिवसेनेत दाखल झाल्या. या सगळ्या घडामोडींनंतर शिवसेनेकडे सध्या २२ विद्यमान नगरसेवक आहेत.
दुसरीकडे शहरात राष्ट्रवादीचे आमदार असल्याने महापालिकेत आम्हीच 'बाहुबली' असे सांगत कमी जागा नकोत असा पदाधिकाऱ्यांचा सूर आहे. भाजपाही राष्ट्रवादीच्या बरोबरीनेच जागांची मागणी करत आहेत. त्यामुळे शिवसेनेवर तडजोडीसाठी दबाव वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र सेनेने आक्रमक भूमिका घेत तडजोड नको, संख्याबळावरच वाटाघाटी होतील असा स्पष्ट संदेश दिला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत होणाऱ्या बैठका निर्णायक ठरणार असून शिंदेसेना युतीत राहणार की, नाही हे कळणार आहे.
"अहिल्यानगरमध्ये सन्मानजक तोडगा निघत असेल तर महायुतीला प्राधान्य"
अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत जागा वाटपात सन्मानजनक तोडगा निघत असेल तर महायुतीला प्राधान्य दिले जाईल. जागा वाटपात मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल विचारात घेतले जावे, हा महायुतीच्याच धोरणाचा एक भाग आहे. त्यानुसारच अहिल्यानगरसाठीही चर्चा होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत शुक्रवारी रात्री उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शहरातील पक्षाचे पदाधिकारी तसेच आजी-माजी नगरसेवकांची बैठक घेतली.
युतीबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाकडून तातडीने पाच सदस्यीय समिती नेमली जाणार आहे. यात पक्षातील वरिष्ठ नेत्यांसह जिल्हास्तरावरील नेत्यांचा समावेश राहील. राज्यात सेनेला सकारात्मक वातावरण असून प्रत्येक ठिकाणी जनतेचा प्रतिसाद मिळत आहे. अहिल्यानगरमध्येही पक्षाचे मजबूत संघटन आहे. तसेच या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी पक्षातील मंत्र्यावर जबाबदारी राहणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्याचे पक्षाचे राज्य प्रवक्ते व जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख संजीव भोर यांनी सांगितले.