"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 17:31 IST2025-12-17T17:04:03+5:302025-12-17T17:31:35+5:30
Harshvardhan Sapkal News: सावळी गावातील ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप
मुंबई - सातारा जिल्ह्यातील सावळी गावात एमडी ड्रग्जचा मोठा कारखाना मुंबई क्राईम ब्रँचने उघड केला पण फडणवीस सरकार हे प्रकरण गांभिर्याने घेत नाही. एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना असल्याचे उघड झाले असताना अद्याप यामागील खऱ्या सुत्रधारावर कारवाई केलेली नाही. या सावळी गावाजवळच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे हे गाव असून त्यांचा भाऊ प्रकाश शिंदे यांचा हा काळा धंदा सुरु होता. सावळी गावातील ड्रग्जचा कारखाना व उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे यांचे लागेबांधे असल्यानेच सरकार ठोस कारवाई करत नाही, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सावळी गावात एवढा मोठा ड्रग्जचा कारखाना सुरु होता त्याची कल्पना सातारा पोलीसांना होती पण त्यांनी कारवाई केली नाही. मुंबई क्राईम ब्रँचने ही कारवाई केली. साताऱ्याचे पोलीस अधिक्षक व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे संबंध आहेत. हे तेच पोलीस अधिक्षक आहेत ज्यांनी आंतरावली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असताना मराठा समाजाच्या माता भगिनींवर अमानुष लाठीहल्ला केला होता. साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणी शिंदे व फडणवीस यांची मिलीभगत आहे का? या प्रश्नाचे उत्तर फडणवीस व शिंदे यांनी दिले पाहिजे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
सपकाळ पुढे म्हणाले की, सातारा ड्रग्ज प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी निवडणुक आयोगाची मदत घेण्यात आली व महानगरपालिका निवडणुकांची घाईघाईने घोषणा करण्यात आली. मतदार याद्या अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. १५ तारखेला मतदार याद्या जाहीर करणार होते पण आता बुथनिहाय २७ तारखेला या मतदार याद्या जाहीर केल्या जाणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास २३ तारखेपासून सुरुवात होत आहे आणि उमेदवारी अर्जावर उमेदवाराला तसेच सुचक, व अनुमोदक यांना त्यांचे मतदार यादीतील भाग क्रमांक, अनुक्रमांक लिहावा लागतो पण मतदार याद्याच नाहीत तर अर्ज कसे भरणार? असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घाईने जाहीर करून निवडणूक आयोगाने बौद्धिक दिवाळखोरी दाखवली आहे.