शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 06:00 IST2025-11-26T06:00:18+5:302025-11-26T06:00:41+5:30
अनेक मार्केटमधून शेवगा गायब झाला आहे. मोजक्या मार्केटमध्येच शेवगा उपलब्ध असून, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो दराने विक्री हाेत आहे.

शेवग्याची शेंग ५०० रुपये किलाेवर; संपूर्ण राज्यात महिनाभर तुटवडा राहणार, कारण काय?
नामदेव मोरे
नवी मुंबई : संपूर्ण राज्यात शेवगा शेंगांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २०० ते ३०० रुपये प्रतिकिलो असा विक्रमी दर मिळत आहे. किरकोळ बाजारात शेवगा ५०० रुपयांवर पोहोचला आहे. पुढील महिनाभर तुटवडा राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी लाभदायक असल्यामुळे त्याची मागणी वाढत आहे. परंतु, अवकाळी पावसामुळे शेवगा शेंगांचे उत्पन्न ठप्प झाले आहे. परराज्यातूनही अत्यंत कमी आवक सुरू आहे. मुंबई बाजार समितीमध्ये प्रतिदिन ६० ते १०० टन शेवगा शेंगांची विक्री होत असते. परंतु, काही दिवसांपासून सरासरी ८ ते १० टनच आवक होत आहे. मंगळवारी एक किलोही आवक झालेली नाही. जुलैमध्ये घाऊक बाजारात शेवगा शेंग २० ते ३० रुपये किलो दराने विकली जात होती. आता हेच दर २०० ते ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. अनेक मार्केटमधून शेवगा गायब झाला आहे. मोजक्या मार्केटमध्येच शेवगा उपलब्ध असून, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो दराने विक्री हाेत आहे.
भाजीमधून शेवगा गायब झाला आहे. याशिवाय इडली, डोशाच्या सांबरमधूनही शेवग्याचा वापर थांबला आहे. शेवगा सूपही बंद झाले आहे. पुढील जवळपास एक महिना तुटवडा कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली
जात आहे.
कुठे-कुठे होते उत्पादन?
सांगली, सोलापूर, नाशिक, सातारा, पालघर जिल्ह्यांमध्ये शेवगा शेंगांचे उत्पादन घेतले जाते. रायगड जिल्ह्यामध्येही काही ठिकाणी शेवगा उत्पादन घेतले जात आहे.
राज्यातील शेवग्याचे उत्पादन थांबले आहे. बाजार समितीमध्येही तुरळक आवक होत असल्यामुळे बाजारभाव वाढले आहेत. पुढील काही दिवस तुटवडा कायम राहण्याची शक्यता आहे. - शंकर पिंगळे, संचालक भाजी मार्केट