राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 06:21 IST2025-11-27T06:20:45+5:302025-11-27T06:21:24+5:30
७१ कॉलेजांत २०हून कमी विद्यार्थी, नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते.

राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
अमर शैला
मुंबई : राज्यात फार्मसी कॉलेजांच्या संख्येत मोठी वाढ असून अनेक ठिकाणी जागा रिक्त राहिल्याने चिंताजनक परिस्थिती उद्भवली आहे. यंदा १० कॉलेजांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला नाही, तर ३७ महाविद्यालयांना १० पेक्षा कमी विद्यार्थी मिळाले आहेत. तसेच ७१ कॉलेजांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सीईटी सेलकडून मिळालेल्या आकडेवारीतून ही बाब स्पष्ट झाली आहे.
जागांची मागणी आणि महाविद्यालयांची संख्या यांतील संतुलन बिघडल्यामुळे भविष्यात या क्षेत्रात बेरोजगारीची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच अनेक कॉलेजांना पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी खर्च भागविणे अवघड जाणार असून, त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होऊ शकतो, असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.
सन २०२२ मध्ये बी. फार्मसीची ३९६ महाविद्यालये होती. केवळ चार वर्षांत त्यांची संख्या १३५ ने वाढून ५३१ वर गेली. परिणामी, जागांमध्येही मोठी वाढ झाली. २०२२ मध्ये ३६,८८८ जागा होत्या. त्यांची संख्या यंदा ४८,८७८वर पोहोचली. २०२२ मध्ये ३२,१३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते, तर यंदा हीच संख्या ३२,९५१ एवढी आहे. फार्मसी अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांची मागणी फारशी वाढली नसतानाही मोठ्या संख्येने कॉलेजांना परवानगी मात्र देण्यात आली.
१०० टक्के जागा भरलेली केवळ १८ महाविद्यालये
बी.फार्मसीच्या केवळ १८ कॉलेजांतील १०० टक्के जागा भरल्या आहेत, तर ९० टक्क्यांहून अधिक जागा भरलेली १४८ महाविद्यालये आहेत. या १४८ कॉलेजांमध्ये १३,७१५ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत.
अशी आहेत शून्य प्रवेश झालेली कॉलेजेस
वर्धमान कॉलेज, कारंजा (लाड), वाशिम
संत गजानन महाराज कॉलेज, चंद्रपूर
स्व. हर्षवर्धन हुमने कॉलेज, भंडारा
राजश्री शाहू महाराज कॉलेज, गोंदिया
ओएसिस कॉलेज, भोजपूर, भंडारा
रत्नदीप फार्मसी कॉलेज, रत्नापूर, अहिल्यानगर
जे.एम. कोलपे कॉलेज, अहिल्यानगर
लेट नारायणदास भवनदास छबडा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, सातारा
रियाजभाई शमनजी कॉलेज, गडहिंग्लज, कोल्हापूर
पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी कॉलेज, वाळवा, सांगली.
अन्यथा बेरोजगारीची समस्या गंभीर वळणावर
नवीन कॉलेजांना देण्यात येणारी परवानगी ही चिंतेची बाब आहे. हे थांबवले नाही तर भविष्यात फार्मसी क्षेत्रात बेरोजगारीची समस्या गंभीर रूप धारण करू शकते. सरकार, विद्यापीठ आणि तंत्रशिक्षण विभागाने तातडीने हस्तक्षेप करून मागणी-पुरवठा संतुलित ठेवण्यासाठी ठोस धोरण आखावे, अशी सूचना ‘इंडियन फार्मास्यूटिकल काँग्रेस एसोसिएशन’चे अध्यक्ष प्रा. मिलिंद उमेकर यांनी केली आहे.
राज्यात फार्मसी कॉलेजांचे आलेले पीक आणि केंद्रिकृत प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे विद्यार्थी फार्मसीपासून दूर जात आहेत. ही परिस्थिती शिक्षणाच्या गुणवत्तेला गंभीर धोका निर्माण करणारी आहे. - प्रा. मिलिंद उमेकर, अध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल कांग्रेस असोसिएशन