राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 06:36 IST2025-07-17T06:36:19+5:302025-07-17T06:36:37+5:30
Maharashtra Politics: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुढील चार-पाच महिन्यांत होणे अपेक्षित आहे.

राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होताच काही नव्या राजकीय पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली आहे. सध्या राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत राजकीय पक्ष असून, त्यातील १५८-१६० पक्षांच्या नावात ‘आघाडी’ तर ४०-४२ ‘सेना’ असा उल्लेख असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पुढील चार-पाच महिन्यांत होणे अपेक्षित आहे. या निवडणुकीत तुलनेत खूपच लहान प्रभाग असल्याने छोट्या पक्षांच्या अपेक्षा वाढतात. अशा लहान ४०३ राजकीय पक्षांची नोंद आयोगाकडे करण्यात आली आहे.
आयोगाकडे लातूरमधून ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ नावाच्या पक्षाची नोंद झाली असून, सांगोल्यातील ‘शेतकरी आघाडी’, म्हसवड येथील ‘नागोबा विकास आघाडी’ यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, यादीत वंचित बहुजन आघाडीच्या मुख्यालयाचा पत्ता बारामतीचा आहे. याशिवाय ‘बंडखोर सेना’, ‘मुस्लीम सेना’, ‘टिपू सुलतान सेना’, ‘उत्तर भारतीय विकास सेना’ असे पक्षही नोंदणीकृत झाले आहेत.
नोंदणीकृत राष्ट्रीय पक्ष : भारतीय जनता पार्टी, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि आम आदमी पार्टी.
राज्यस्तरीय पक्ष : महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार.
गेल्या सहा महिन्यांत
१२ नवे राजकीय पक्ष
आयोगाकडे ५ राष्ट्रीय पक्ष, ५ प्रादेशिक (राज्यस्तरीय) आणि १० इतर राज्यांतील मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्षांचीही नोंद आहे. गेल्या सहा महिन्यांत १२ नवे राजकीय पक्ष नोंदवले गेले असून, काही जुने नोंदणी रद्द झालेले पक्षही अटी-शर्तींची पूर्तता करून नोंदणी पूर्ववत करीत आहेत.
आयोगाकडे नोंदणीकृत राजकीय पक्ष विहित वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणुकीत आपापले उमेदवार उभे करू शकतात, असे राज्य निवडणूक आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.