मग जिंकल्यावर 'ते' निवडणूक आयोगाकडे का जात नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 12:14 IST2025-10-17T12:10:31+5:302025-10-17T12:14:26+5:30
लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

मग जिंकल्यावर 'ते' निवडणूक आयोगाकडे का जात नाहीत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल
रत्नागिरी : विरोधी पक्षनेता देण्याइतकी संख्याही विरोधकांकडे राहिलेली नाही. विरोधक हरल्यानंतर रोज निवडणूक आयोगाकडे जात आहेत. न्यायालयाला सल्ला देत आहेत. मग जिंकल्यावर ते आयोगाकडे का जात नाहीत, असा प्रश्न उपमुख्यमंत्री आणि शिंदेसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केला. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचे २३२ आमदार निवडून आले आहेत. ही योजना कधीही बंद होणार नाही, असेही ते म्हणाले.
शिंदेसेनेच्या बूथप्रमुखांचा मेळावा गुरुवारी (दि. १६) रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात झाला. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार दीपक केसरकर, आमदार नीलेश राणे, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, माजी आमदार सुभाष बने, संजय कदम, राजन साळवी, सदानंद चव्हाण, राजन तेली, माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडीक व अन्य उपस्थित होते.
शिवसेना हे कुटुंब आहे. मी या कुटुंबाचा प्रमुख आहे आणि तुम्ही माझी ताकद आहात. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्तांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत, यासाठी तातडीने निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, असे त्यांनी आवर्जून सांगितले.