"मंत्रालयाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. मंत्री हा मंत्री असतो. ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे, ती माझ्यासाठी धक्कादायक आहे. लाचलुचपत कोणाला रिपोर्टिंग करते? गृह मंत्रालयाला. ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बसतात. गृह खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आहे. सहाव्या मजल्यावरील गृह मंत्रालयानेच तिसऱ्या, चौथ्या मजल्यावरील त्याच्या मंत्रिमंडळातील, त्यांच्याच मंत्र्यांकडे एसीबी जाणे, धक्कादायक नाहीये का? मग ती तक्रार कोणी केली? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे", असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील लिपीक राजेंद्र ढेरंग याने मंत्रालयातील कार्यालयातच लाच स्वीकारली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमुळे झिरवळ अडचणी आले असून, मंत्रालयातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
'मुख्यमंत्र्यांच्या नाकाखालीच छापा टाकला'
याबद्दल दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "कुणी तरी माहिती दिली ना? मग ती कुणी दिली. स्वतःच्याच मंत्र्याविरोधात, ज्या मंत्रालयाचे अध्यक्ष तुम्ही आहात. विभाग तुमचा आहे. तुम्हीच तुमच्या मंत्र्यावर छापा टाकता. म्हणजे त्यांच्या नाकाखालीच. मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये, तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याविरोधात, त्याचं कार्यालय तुम्ही सील करता. हे खूपच धक्कादायक आहे. मला यावर विश्वास बसत नाहीये. म्हणजे आपल्याच घरात, आपण आपल्याच माणसावर धाड टाकणं", असे म्हणत सुप्रिया सुळे संपूर्ण प्रकरणावर प्रश्न उपस्थित केला आहे.
"तो विभाग मुख्यमंत्र्यांकडे आहे. मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्र्याविरोधात... पुन्हा पुन्हा बोलतेय की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता, तेव्हा पक्षाचे नसता. राज्याचे मुख्यमंत्री असता. मंत्री पक्षाचा नसतो, राज्याचा असतो. तुमच्या कॅबिनेटमधील तो मंत्री आहे. आपल्याच टीम मधील सदस्यावर कारवाई. कार्यालय सील केल्याचे मला माध्यमातून कळले", असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पार्थ पवारांना खारगे समितीकडून क्लीन चीट, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
"सूत्रांवर मी विश्वास कसा ठेवणार? जोपर्यंत अहवाल मी बघत नाही. सरकारचा अहवाल जोपर्यंत आपण वाचत नाही, त्यावर आपण कसं बोलणार? रिपोर्ट आला, तर तो मी वाचेन आणि त्यावर बोलेन. अहवाल गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला? आणि माझ्यासारख्या व्यक्तीने रिपोर्ट वाचल्याशिवाय बोललं नाही पाहिजे", सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"माध्यमांमध्ये बातमी बघून मी पार्थला कॉल केला होता. मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता. पार्थ मला म्हणाला होता की, आत्या मी काही चुकीचे केले नाही. मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून बोलले. मला असं वाटतं की, आपण ज्या मुलांना जन्मापासून बघितले आहे आणि त्यांच्यावर जे संस्कार झाले आहेत. माझी त्याच्याकडून अपेक्षा आहे की ते असे कोणतेही काम करणार नाही आणि करु नये", अशी सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
Web Summary : Supriya Sule questions CM Fadnavis about the complaint leading to the action against Minister Zirwal, highlighting the unusual nature of the situation within the ministry itself. She also commented on Parth Pawar getting clean chit.
Web Summary : सुप्रिया सुले ने मंत्री झिरवल के खिलाफ कार्रवाई को लेकर मुख्यमंत्री फडणवीस से सवाल किया कि शिकायत किसने दर्ज कराई। उन्होंने मंत्रालय के भीतर की असामान्य स्थिति पर प्रकाश डाला। पार्थ पवार को क्लीन चिट मिलने पर भी टिप्पणी की।