गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी पोलिसांनी अनेक समाजकंटकांवर कारवाई केली आहे. तसेच या दंगलीतील मुख्य आरोपी असलेल्या फहीम खान याच्या घरावर आज पालिकेने बुलडोझर चालवला. नागरूपमध्ये घडलेल्या दंगलीप्रकरणी दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचा इशाराही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सत्ताधारी महायुती सरकारला बोचरा प्रश्न विचारला आहे. नागपूरच्या दंगेखोराच्या घरावर बुलडोझर चालवला, मग दंगलीला चिथावणी देणाऱ्या नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर कधी चालवणार? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, नागपूरच्या दंगेखोरांकडून नुकसान भरपाई वसूल करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तशीच वसुली एकानाथ शिंदे व त्यांच्या दंगेखोरांकडून सरकार वसूल करणार का, याचे उत्तर द्यावे. नागपूर दंगलीतील आरोपी फहीम खानच्या घरावर सरकारने बुलडोझर चालवला आहे. फडणवीसांच्या मंत्रीमंडळातील मंत्री नितेश राणे यांनी चिथावणीखोर, भडकाऊ विधाने केली आहेत मग फडणवीस नितेश राणेंच्या घरावर बुलडोझर चालवणार का, अशी विचारणा हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
दरम्यान, सोमवारी महाल, हंसापुरीत झालेल्या दंगल व जाळपोळीच्या घटनेचा कथित सूत्रधार फहीम खान शमीम खानच्या घरावर अखेर नागपूर महानगरपालिका प्रशासनाचा बुलडोझर चालला आहे. यशोधरानगर येथील संजयबाग कॉलनीतील घरात त्याने अनधिकृत बांधकाम केल्याची बाब समोर आली होती व मनपा प्रशासनाने त्याला नोटीस बजावली होती. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात फहीमच्या घरावर बुलडोझर चालविण्यात आला व अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले.