...Then Shiv shiv sena will not have any relation with BJP - Uddhav Thackeray | महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर भाजपाशी कोणतंही नातं ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा
महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर भाजपाशी कोणतंही नातं ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई - राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या तिढ्यासाठी शिवसेनेला जबाबदार ठरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावरून दिलेल्या आश्वासनावरून केलेला खोटारडेपणा जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत भाजपाशी चर्चा करणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले. तसेच मला खोटा ठरवत असतील तर भाजपाशी कोणतंही नातं ठेवणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. 

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि अधिकारपदांच्या समसमान वाटपांच्या मुद्यांवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच प्रत्युत्तर दिले आहे. 

''पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले होते.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

 ''मात्र आता मला खोटा ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. खोटं बोलणं आमच्या संस्कारात नाही. खरा कोण, खोटा कोण हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे खोटारडेपणा जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत भाजपाशी चर्चा करणार नाही. तसेच मला खोटा ठरवत असतील तर भाजपाशी कोणतंही नातंही ठेवणार नाही,'' असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.  दरम्यान, ''चर्चेसाठीचे दरवाजे आम्ही बंद केलेले नाही. मात्र भाजपावाले खोटे बोलले त्यामुळे आम्ही चर्चा थांबवली आहे. तसेच आम्ही एनसीपीशी चर्चा केलेली नाही,'' असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

 

Web Title: ...Then Shiv shiv sena will not have any relation with BJP - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.