लोकसभा, विधानसभा निवडणुकीत बीडमधील प्रत्येक बुथवर मतदारांना धमक्या कशा दिल्या गेल्या, दहशत आणि मतदान कसे करू दिले नाही, हे निवडणूक आयोगाने, फडणवीस आणि अमित शाह यांनी देखील पाहिले आहे. त्यांची निवडणूक तेव्हाच रद्द करायला हवी होती. तसे झाले असते तर संतोष देशमुखचे प्राण वाचले असते, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये संतोष देशमुखांना क्रूरपणे मारहाण करण्यात आली, त्यांच्यावर लघवी करण्यात आली. एकीकडे छावा चित्रपटातून औरंगजेबाची क्रुरता दाखविली जात असताना दुसरीकडे त्याच महाराष्ट्रात एका सरपंचावर अशा प्रकारे क्रुरता केली जाते, हे काय आहे, असा सवाल राऊत यांनी केला. यातील सर्व लोक धनंजय मुंडे यांच्याशी संबंधीत आहेत. मुंडे कोणी महात्मा नाहीत. हे मिस्टर फडणवीस यांनाही माहिती आहे. अजित पवारांनाही माहिती आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
मुख्यमंत्रई फडणवीस यांनी ही घटना समोर येताच पहिल्या २४ तासांतच मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवा होता. पण ते म्हणत होते कोर्ट ठरवेल. नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतला असता तर फडणवीस यांनी न्याय केला असे आम्ही छातीठोकपणे सांगू शकलो असतो. परंतू या राज्याचे गृहमंत्रीच कायदा आणि न्यायाची बूज राखत नाहीत. फडणवीस म्हणजे रामशास्त्री नाहीत. ते काही लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करतात. त्याला न्याय म्हणत नाहीत, अशी टीका राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केली.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा...धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली होती. त्यातच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून लोकांमध्ये संताप पसरला. आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.