शेवगावमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या
By अण्णा नवथर | Updated: October 26, 2023 13:38 IST2023-10-26T13:37:50+5:302023-10-26T13:38:12+5:30
मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक गावांतील रिकाम्या बसेस माघारी परतल्या आहेत.

शेवगावमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेला जाणाऱ्या बसच्या काचा फोडल्या
अहमदनगर: तालुक्यातील कोळगाव येथे एसटी बसच्या काचा फोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. दरम्यान, गावागावात मोदी यांच्या सभेसाठी जाणाऱ्या लोकांसाठी बसेस दाखल झाल्या होत्या. मात्र, मराठा समाजाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अनेक गावांतील रिकाम्या बसेस माघारी परतल्या आहेत.
मंगरुळ कडे जात असताना, कोळगाव शिवारात राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एमएच १४ बीटी २१५८ हिच्या काचा अज्ञात व्यक्तींनी फोडल्या. त्यानंतर चालक पी.पी. शिंदे यांनी बस चालवत शेवगाव आगारात आणून उभी केली. मराठा समाज आरक्षण मागणीवरुन शिर्डी येथे आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर सकल मराठा समाजाने बहिष्कार टाकला आहे. त्याची धग, तालुक्याच्या अनेक गावात सभेला जाण्यास आलेल्या बसेस गावागावातून रिकाम्या पाठविण्यात आल्या. कोळगाव येथे बसच्या काचा फोडण्यात आल्यानंतर रिकाम्या सुमारे ४० बसेस पाथर्डी रोडवरील तहसील कार्यालयाजवळ असणाऱ्या शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात लावण्यात आल्या आहेत.
तालुक्यात शेवगावसह इतर आगाराच्या ५६ एसटी बसेसची सुविधा करण्यात आली होती. मात्र सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जवळपास ५० बसेस परत पाठविण्यात आल्या. गावागावात सकल मराठा समाज रस्त्यावर उतरुण आक्रमक झाला होता. त्यांनी गावात सभेसाठी जाणाऱ्या बसेसला अडवले.