दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 07:47 IST2025-10-01T07:47:15+5:302025-10-01T07:47:49+5:30
रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत.

दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
अलिबाग :रायगड जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद मिटता मिटत नसल्याचे चित्र आहे. पालकमंत्रिपदावरून सुरू झालेल्या कुरघोडी अजूनही सुरूच आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी पुन्हा एकदा खासदार सुनील तटकरे डिवचले असून, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 'एकला चलो'चा नाराही दिला आहे. तटकरे यांनीही कोणाच्या टीकेला महत्त्व देत नसल्याचे सांगत दळवी यांच्या टीकेला उत्तर दिल्याने जिल्ह्यात शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद शिगेला पोहोचला आहे.
महायुतीतील घटक पक्ष असलेले शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात रायगड जिल्ह्यात विस्तव जात नाही. पालकमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांत उघड-उघड वाद पेटलेला आहे. खासदार सुनील तटकरेंवर टीका करण्याचा विडाच जणू शिंदेसेनेच्या आमदारांनी उचलला आहे. आमदार महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी तिघेही राष्ट्रवादी काँग्रेसवर आगपाखड करीत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदेसेनेचे 'एकला चलो रे'
१. रोहा येथील कार्यक्रमात आ. दळवी यांनी खा. तटकरेंसोबत जाणार नसल्याचे सांगत जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका जाहीर केली आहे.
२. जे सोबत येतील त्यांना घेऊन, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय लढण्याची ताकद तयार केली आहे. नवरात्रोत्सव संपल्यानंतर दिवाळी असून, शिवसैनिकांनो असा फटका वाजवा की, तटकरे घराबाहेर पडले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांनी केले आहे.
सभ्यतेतून वैचारिक पातळीवर उत्तर देणार
खा. सुनील तटकरे यांनीही आ. महेंद्र दळवी यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. कोणाच्या टिकेला महत्त्व देत नाही, टिकेला उत्तर देण्यासाठी प्रवक्ते ठेवले आहेत. आमच्या पक्षाने सभ्यता पाळली आहे.
सभ्यतेच्या माध्यमातून वैचारिक पातळीवर उत्तर देऊ. खालच्या पातळीवरील टीका पाहायला मिळत असते, अशावेळी फारसे फरक पडत नाही, असे उत्तर तटकरे यांनी दिले आहे.