"लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 19:58 IST2025-04-15T19:58:00+5:302025-04-15T19:58:42+5:30

आता लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपयेच दिले जाणार...?

The value of the votes of ladki-bahin has now reached Rs 500 says sanjay Raut | "लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल

"लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली, उद्या...!"; राऊतांचा हल्लाबोल

गेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेची जबरदस्त चर्चाही झाली. या योजनेवरून विरोधक सातत्याने सरकारवर टीका करत असतात. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या योजनेसंदर्भात एका मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. 'आता लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपयेच दिले जाणार आहेत', असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. यानंतर आता, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनही यासंदर्भात भाष्य केले आहे.

काय म्हणाले राऊत? - 
या योजनेसंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, "ज्या लाडक्या बहिणींकडून १५०० रुपयांच्या  बदल्यात मतं विकत घेतली, त्या मतांची किंमत आता ५०० रुपयांवर आली आहे, ती उद्या शून्यावर येईल. या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कर्मचाऱ्यंचे पगार द्यायलाही पैसे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आव आणावा? हे राज्य चालवणे हे आर्थिक दृष्ट्या सोपे राहिलेले नाही. कारण गेल्या साडेतीन वर्षांत या राज्याची  आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली आहे. आर्थिक बेशिस्त आणि अर्थिक अराजक अशा खाईत हे राज्य सापडले आहे." एवढेच नाही तर, "मिस्टर अजित पवार हे बोलत नसले, तरी, त्यांनाही या चिंतेने ग्रासलेले आहे," असेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार -
लाडकी बहिण योजनेसंदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले होते, "लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांना दरमहा दिल्या जाणाऱ्या १५०० रुपयांत घर चालते का? पण ज्या महिलांना कुटुंबात आधार नाही, अशा महिलांना सरकार १५०० रुपये देत होते, त्यांना फायदा झाला असता. आता लाडक्या बहि‍णींना १५०० रुपयांऐवजी फक्त ५०० रुपयेच दिले जाणार आहेत. सरकारच्या या निर्णयाची कीव करावीशी वाटते. हे फार दुर्दैवी आहे. सरकारने मतासाठी त्यावेळस सरसकट महिलांना लाभ दिला आणि मत घेतली. मात्र, आता ही योजना गुंडाळण्यासाठी आणि सरकारी तिजोरीवरील ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या क्लृप्त्या काढणे हे निंदनीय आहे."  तसेच, ज्यावेळेस ही योजना लागू केली, त्यावेळी सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? सरकारच्या बुद्धीला लकवा मारला होता का? असाही सवालही विजय वडेट्टीवारांनी उपस्थित केला होता.

Web Title: The value of the votes of ladki-bahin has now reached Rs 500 says sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.