"लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आलेल्या तीन भावांनी लाखो बहिणींशी गद्दारी केली’’, नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 17:14 IST2025-02-08T17:12:38+5:302025-02-08T17:14:01+5:30

Nana Patole Criticize Mahayuti Government: सरकारने ५ लाख बहिणींना अपात्र केले असून आणखी काही लाख बहिणींना असेच अपात्र केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

"The three brothers who came to power on the votes of their beloved sisters betrayed millions of sisters," says Nana Patole | "लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आलेल्या तीन भावांनी लाखो बहिणींशी गद्दारी केली’’, नाना पटोलेंची टीका

"लाडक्या बहिणींच्या मतांवर सत्तेत आलेल्या तीन भावांनी लाखो बहिणींशी गद्दारी केली’’, नाना पटोलेंची टीका

मुंबई - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता भगिनींची घोर फसवणूक केली आहे. मतांसाठी सरसकट सर्व बहिणींना १५०० रुपये देऊन त्यांची मते घेतली व सत्तेवर आल्यानंतर मात्र या बहिणींना दिलेल्या मदतीला कात्री लावण्याचे पाप केले जात आहे. सरकारने ५ लाख बहिणींना अपात्र केले असून आणखी काही लाख बहिणींना असेच अपात्र केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने लाभार्थी बहिणींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी केलेली गद्दारी आहे, अशी टीका  काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, लाडकी बहीण ही योजना केवळ विधानसभा निवडणुकीत माताभगिनींची मते मिळवण्यासाठी होती, निवडणुकीनंतर भाजपा युती त्यांचे खरे रंग दाखवले असे आम्ही सातत्याने बजावले होते आणि शेवटी महायुतीच्या भावांनी लाडक्या बहिणींना सावत्रपणाची वागणूक देण्यास सुरुवात केली आहे. आधी सरसकट १५०० रुपये दिले आणि सत्तेवर आल्यानंतर दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले पण २१०० रुपये देण्याचे दूरच राहिले, आहे त्या योजनेतील लाभार्थ्यांना निकष, नियम व अटी लावून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लाखो माता भगिनींची फसवणूक केली आहे. योजना लागू करतानाच निकष ठरवले जातात पण मते मिळवण्यासाठी शिंदे भाजपा सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आणि आता सत्ता मिळाल्यानंतर मात्र बहिणींना निकष लावून पैसे देणे बंद करत आहेत हे दुर्दैवी आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत घेऊन महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदानात झालेल्या घोटाळ्याची आकडेवारीसह मांडणी करून निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले आहेत. राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त कशी? वाढलेल्या मतदारांची यादी फोटो, नावे पत्त्यांसह द्यावी, तसेच संध्याकाळी ५ वाजल्यानंतर ७६ लाख मते कशी वाढली? हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत, त्यावर निवडणूक आयोग उत्तरे देत नाही. विधानसभा निवडणुकीतील निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट दिसत आहे, तेच राहूल गांधी यांनी विरोधी पक्षनेते या नात्याने सांगितले आहे. यात देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांना मिरच्या का झोंबल्या? भाजपाने निवडणूक आयोगाचे वकिलपत्र घेतले आहे का? निवडणूक आयोग ही स्वायस्त संस्था असून निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे हे त्यांचे कर्तव्यच आहे. काँग्रेस व विरोधी पक्षाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे निवडणूक आयोगाने द्यावीत. काही गडबड घोटाळा झाला नाही असे भाजपा व आयागोची वकिली करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना वाटत असेल तर उत्तरे देण्यात अडचण काय? असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Web Title: "The three brothers who came to power on the votes of their beloved sisters betrayed millions of sisters," says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.