‘समृद्धी’चा तिसरा टप्पा; लोकार्पण होणार ४ मार्चला, भरवीर ते इगतपुरी दरम्यानचे काम पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 09:43 IST2024-03-01T09:43:13+5:302024-03-01T09:43:24+5:30
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता.

‘समृद्धी’चा तिसरा टप्पा; लोकार्पण होणार ४ मार्चला, भरवीर ते इगतपुरी दरम्यानचे काम पूर्ण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे. येत्या ४ मार्चला हा टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्याची तयारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पूर्ण केली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाने नागपूर येथून आलेल्या वाहनांना थेट इगतपुरीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे.
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून त्यातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये सुरू करण्यात आला होता. तर या महामार्गाचा शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पाही सुरू करण्यात आला असून, आता सुमारे ६०० किमी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. एमएसआरडीसीकडून भरवीर ते इगतपुरीदरम्यानच्या २३ किलोमीटरच्या मार्गाची कामे पूर्ण झाली असून, आता तो येत्या ४ मार्चपासून सुरू केला जात आहे. त्यामुळे हा रस्ता सुरू झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना विनाअथडळा द्रुतगती महामार्गाने मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचता येणार आहे.
शेवटचा टप्पाही...
एमएसआरडीसीकडून इगतपुरी ते आमनेपर्यंतच्या शेवटच्या टप्प्याचीही कामे वेगाने सुरू आहेत. सद्य:स्थितीत या मार्गाची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मात्र अभियांत्रिकीदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या एका उड्डाणपुलाचे काम पूर्ण होणे बाकी आहे. हे काम पूर्ण करून हा मार्गही जुलैपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. त्यातून नागपूर ते मुंबई हा संपूर्ण प्रवास समृद्धी महामार्गावरून करणे वाहनांना शक्य होणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचे लोकार्पण ४ मार्चला होत आहे. तर उर्वरित महामार्गाची कामे जुलैपर्यंत पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
- अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी