कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 06:31 IST2026-02-12T06:30:28+5:302026-02-12T06:31:07+5:30
काही दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेत भाजप आणि शिंदेसेनेचे नगरसेवक आपआपले गट करून सभागृहात बसले होते.

कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?
म्हणतात ना...‘दैव देतं कर्म नेतं’
‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ किंवा ‘दैव देतं कर्म नेतं’ अशी काहीशी अवस्था काँग्रेसची चंद्रपूरमध्ये झाली आहे. राज्यात सगळ्याच ठिकाणी सपशेल आपटले मात्र चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला हात देत सत्ता स्थापनेची संधी दिली. त्या दिवसापासून काँग्रेसमधील आ. विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर यांच्या दोन गटात महापौर पदावरून वाद सुरू होता. वाद दिल्लीपर्यंत गेला. त्यावर वडेट्टीवार आणि धानोरकर यांना प्रत्येकी अडीच वर्षे महापौर मिळेल, असे ठरले. मंगळवारी निवडणूक झाली आणि उद्धवसेनेने भाजपला पाठिंबा देत काँग्रेसला बाजूला सारले. त्यामुळे ना वडेट्टीवार, ना धानोरकर, महापौर झाला तो भाजपचा.
‘ते’ भाजपला पाठिंबा देणार का?
नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत भाजपचे ६५, शिंदेसेनेचे ४२, उद्धवसेना २, मनसे १ आणि अपक्ष १ नगरसेवक निवडून आले आहेत. यामधील अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या ६६ झाली आहे. काही दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेत भाजप आणि शिंदेसेनेचे नगरसेवक आपआपले गट करून सभागृहात बसले होते. उद्धवसेनेचे २ आणि मनसेचा १ नगरसेवकदेखील भाजप नगसेवकांच्या रांगेत बसल्याने त्यांचा भाजपला पाठिंबा असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. त्यामुळे आगामी काळात महापालिका सभागृहातदेखील ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का? असा प्रश्न केला जात आहे.
जाण्यापूर्वी एकदा पत्ते पिसणार का ?
पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईचा कार्यभार घेतल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. यामुळे खऱ्या अर्थाने अनेक अधिकारी खाकीच्या मूळ कर्तव्याला जागले. मात्र, दीड वर्षात पुन्हा अवैध धंद्यांना मोकळे रान देण्यापासून ते कारवाईच्या नावाखाली लुटमारीचे प्रकार घडत आहेत. भारंबे यांच्यासह उपायुक्तांपर्यंत संपूर्ण फळीचा कार्यकाळ संपला असून, ते बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापूर्वीच भारंबेंच्या जाण्याकडे डोळे लावून बसलेले व राजाश्रय असलेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पूर्वास्थेत येण्यावर भर दिला आहे. अशांना झटका देण्यासाठी भारंबेंनी पुन्हा एकदा पत्ते पिसून काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचे खांदेपालट करणार का, असा सवाल सुज्ञांचा आहे.
आता चौदा गावे कधी वगळणार?
चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्यापासून वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यास विरोध केला. ही गावे नवी मुंबईत नको अशी स्पष्ट भूमिकाही घेतली होती. निवडणूक झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून ही गावे वगळण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. महापालिका निवडणुकीमध्ये याच विभागातून भाजपचे दाेन नगरसेवक निवडून आले आहेत. एक अपक्षानेही भाजपला पाठिंबा दिला आहे. निवडणूक झाल्यापासून चौदा गावे वगळण्याचा विषयही शांत झाला आहे. परंतु, आता गणेश नाईक बोलल्याप्रमाणे ही गावे नवी मुंबईमधून वगळणार का, वगळण्याचा मुहूर्त कधीचा असणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हा विरोध फक्त राजकारणासाठी होता की खरेच होता अशी चर्चा सुरू झाली आहे.