संघ सलग तीन सामने हरला, संतप्त तरुणाने विरोधी संघातील खेळाडूची बॅटने मारून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:51 IST2023-11-07T13:48:58+5:302023-11-07T13:51:33+5:30
Crime News: महाराष्ट्रातील भंडारा येथे क्रिकेट सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीमध्ये एका २४ वर्षीय तरुणाची बॅटने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली.

संघ सलग तीन सामने हरला, संतप्त तरुणाने विरोधी संघातील खेळाडूची बॅटने मारून केली हत्या
महाराष्ट्रातील भंडारा येथे क्रिकेट सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे क्रिकेट सामन्यादरम्यान झालेल्या वादावादीमध्ये एका २४ वर्षीय तरुणाची बॅटने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी दुपारी चिखली गावात ही घटना घडली. मृत तरुणाची ओळख निवृत्तीनाथ कावले, अशी पटली आहे.
पोलिसांनी सांगितले की, करण बिलावने नावाच्या तरुणाने वादावादीनंतर निवृत्तीनाथ याच्यावर बॅटने हल्ला केला. आरोपी तरुणाचा संघ सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला होता. त्यानंतर हा वाद सुरू झाला होता. मारहाणीमध्ये निवृत्तीनाथ याच्या मानेला गंभीर दुखापत झाली होती. त्याला जवळच्या रुग्णालयात नेते असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
क्रिकेट सामन्यातील वादानंतर हत्येची ही पहिलीच घटना नाही आहे. याआधी जून महिन्यामध्ये उत्तर प्रदेशातील कानपूरमध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी घाटमपूर येथील डेरा राठी खालसा गावामध्ये क्रिकेट सामना सुरू होता. तिथे हरगोविंद नावाचा तरुण फलंदाजी करत होता. आणि सचिन नावाचा तरुण गोलंदाजी करत होता. सचिनने हरगोविंदचा त्रिफला उडवल्यानंतर हरगोविंदचा राग अनावर झाला आणि त्याने सचिनला मारहाण केली. हरगोविंदचा भाऊही तेव्हा तिथेच उपस्थित होता. त्यानंतर या दोन्ही भावांनी मिळून सचिनचा गळा आवळला आणि त्याची हत्या केली.