१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:34 IST2025-05-22T13:34:19+5:302025-05-22T13:34:53+5:30
Sanjay Raut on Money in Dhule Rest House: विश्रामगृहामध्ये १०२ नंबरच्या खोलीला टाळे ठोकून ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे तिथेच ठिय्या आंदोनलाला बसले होते. या खोलीत अंदाज समितीच्या आमदारांना देण्यासाठी ५ कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता.

१५ कोटींचे टार्गेट होते...! खोतकरांची ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याची धमकी; धुळे विश्रामगृहातील पैशांवर राऊतांचा मोठा दावा
धुळ्यातील गुलमोहर विश्रामगृहातील १०२ नंबरच्या खोलीत १.८४ कोटी रुपयांची रोकड सापडल्यावरून ठाकरे गट शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी जमा करण्याची जबाबदारी अंदाज समिती अध्यक्षांनी ठेकेदारावर दिली होती. पैसे जमा होत नव्हते म्हणून खोतकरांनी ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकेन अशी धमकी दिली होती, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
विश्रामगृहामध्ये १०२ नंबरच्या खोलीला टाळे ठोकून ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे तिथेच ठिय्या आंदोनलाला बसले होते. या खोलीत अंदाज समितीच्या आमदारांना देण्यासाठी ५ कोटी रुपये ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. बुधवारी रात्री हा प्रकार घडला होता. प्रांताधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांनी पंचनामा करत या खोलीचे कुलूप तोडले आणि आतमध्ये त्यांना १.८४ कोटी रुपये सापडले आहेत. धुळे पोलीस गुन्हा दाखल करत आहेत. आता पैसे सापडल्याने राजकारणात खळबळ उडाली असून ठाकरे गटाने हा मुद्दा उचलण्यास सुरुवात केली आहे.
महाराष्ट्रातला भ्रष्टाचार कोणत्या थरापर्यंत गेलेला आहे, तर तो विधिमंडळापर्यंत गेलेला आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे,अजित पवार यांच्या राज्यात या मंदिरापर्यंत भ्रष्टाचार पोहोचला. राज्याचे मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष या घोटाळ्याचे मुकसमर्थक आहेत. कमिटीचे चेअरमन अर्जुन खोतकर जे ईडीला घाबरून शिंदे गटात गेले ते किती भ्रष्ट आहेत ते पहा. गेल्या तीन दिवसांपासून पाच ते साडेपाच कोटींची कॅश धुळ्याच्या त्या विश्रामगृहात जमा होते. कमी दर्जाची कामे झालेली आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामांमध्ये इतर क्षेत्राच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळे झालेले आहेत, असा आरोप राऊत यांनी केला.
या सर्व ठेकेदारांकडून 15 कोटी जमा करण्याची जबाबदारी अंदाज समितीच्या अध्यक्षांकडून ठेकेदाराने घेतली. त्यासाठी अध्यक्षांचे पीए 102 क्रमांकाच्या खोलीमध्ये पैसे जमा करत होते. 15 कोटी रुपये अंदाज समितीच्या अध्यक्षांना देण्याच ठरले होते. पुढल्या दोन दिवसात दहा कोटी जमा होणार होते. नाहीतर सर्व ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस मी करेन अशी धमकी अर्जुन खोतकर यांनी ठेकेदारांना दिली होती. त्यानंतर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, असा आरोप राऊत यांनी केला.
अनिल गोटे यांनी शिवसैनिकांसह विश्रामगृहावर धडक मारली. हे पाहून कार्यालयातील लोक टाळे लावून पळून गेले. चार ते पाच तास ना पोलीस आले ना जिल्हाधिकारी आले. आमच्या दबावानंतर ही लोक आली असा आरोप राऊत यांनी केला. खोतकरांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांच्या नावावर ही खोली होती. गुन्हा दाखल करून हे प्रकरण ईडी आणि सीबीआयला देणे गरजेचे आहे. तसेच अंदाज समितीच्या बैठका कशा आणि कुठे झाल्या याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही राऊत यांनी केली.
तसेच मुलुंडचा पोपटलाल दुसऱ्या पक्षाच्या कोणी असे केले असते, तर टणाटणा उड्या मारत धुळ्यात गेला असता, आंदोलन केले असते, असा टोलाही राऊत यांनी किरिट सोमय्या यांना लगावला. हे मनी लॉन्ड्रींग आहे. एवढा पैसा आला कुठून? मी ईडीला पत्र लिहिणार आहे आणि हा पैसा कुठून आला आहे, याची चौकशी करायला सांगणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.